चोपडा तालुक्यातील वेळोदे येथे आजपासून खंडेराव महाराजांची यात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2019 04:59 PM2019-12-01T16:59:11+5:302019-12-01T16:59:32+5:30
वेळोदे येथील खंडेराव महाराजांची यात्रा २ डिसेंबरपासून सुरू होत आहे.
वेळोदे, ता.चोपडा, जि.जळगाव : वेळोदे येथील खंडेराव महाराजांची यात्रा २ डिसेंबरपासून सुरू होत आहे. परिसरातील २७ गावांचा संबंध असणाऱ्या या यात्रेला विशेष महत्त्व आहे.
यात्रेसाठी ग्रामस्थ, ग्रामपंचायत सरपंच सर्व सदस्य व बोरसे बंधूंनी जय्यत तयारी केली आहे. विविध दुकाने थाटली आहेत. दरवर्षी मार्गशीर्ष चंपाषष्टीला श्री खंडेराव महाराजांची यात्रा भरते. खान्देशात ही यात्रा प्रसिद्ध असून जवळपास आठ ते दहा दिवस चालते. यात्रेनिमित्त गावात प्रत्येकाच्या घरी पाहुणे मंडळींची वर्दळ असते.
यात्रेची आख्यायिका
सन १९०२ मध्ये वेळोदे येथील मोतीराम तुळशीराम बोरसे यांच्या स्वप्नात खंडेराव महाराज आले व त्यांनी जमीन शोधण्यास सांगितले. प्रत्यक्ष खोदकामानंतर श्री खंडेराव महाराजांची मूर्ती सापडते. त्या ठिकाणाहून मूर्ती हलवून नवीन जागेत स्थानापन्न करण्यात आली. सन १९३८ मध्ये सुकलाल तुळशीराम बोरसे व वंजी सखाराम बोरसे यांनी बाजारचौकात मूर्तीची प्राणप्रतिष्ठाची स्थापना केली व तेव्हापासून गावात चंपाषष्ठीला गावात यात्रा भरण्यास सुरवात आली.
खंडेराव महाराजांची पालखीत मिरवणूक
चंपाषष्टीच्या दिवशी खंडेराव महाराजांची तळई उठवली जाते. त्या वेळी पूजा करून साखर व गुळाचा प्रसाद वाटला जातो. बोरसे भाऊबंद व खंडेराव महाराज यांच्या भक्तीच्या घरी तळी उठवली जाते. टाळमृंदगाच्या गजरात खंडेराव महाराजांच्या प्रतिमेची व पालखीत मिरवणूक काढली जाते. पूजाविधी करून भरीत भाकरीचा नैवैद्य देऊन त्या दिवस पासून वांगे खाण्यास सुरवात होते.
तमाशाचे आकर्षण
यात्रेत तमाशाचे मुख्य आकर्षण असते. येथे वृंदा पाटील, संजय बारकू पिराजी, राजेश गणेश, अंजली नाशिककर व रघुवीर खेडकर अशा विविध तमाशांचे कार्यक्रम होत असतात. गेल्या ७७ वर्षांपासून ग्रामीण संस्कृतीचा ठेवा जपणारी ही यात्रा आठ ते दहा दिवस चालत असते. परिसरातील अनेक भाविक नवस फेडण्यासाठी येथे येत असतात.
मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम पूर्ण
गेल्या तीन वर्षांपूर्वी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी भक्तांनी देणग्या दिल्यामुळे काम पूर्ण झाले. यात्रा कालावधीत पोलीस व वीज वितरण कंपनीचे अधिकारी लक्ष देत असल्याचे सरपंच मनीषा बोरसे व यात्रा कमेटीने सांगितले.