यंदा उन्हाळ्यात खान्देश राहणार ‘भारनियमन मुक्त’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:17 AM2021-03-16T04:17:15+5:302021-03-16T04:17:15+5:30
दरवर्षी उन्हाळा सुरू होताच, नागरिकांना भारनियमनाची चिंता सतावते. या दिवसात विजेची मागणी दुप्पटीने वाढत असल्यामुळे, विजेचा तुटवडा ...
दरवर्षी उन्हाळा सुरू होताच, नागरिकांना भारनियमनाची चिंता सतावते. या दिवसात विजेची मागणी दुप्पटीने वाढत असल्यामुळे, विजेचा तुटवडा निर्माण होतो. अशा वेळेस शहरासह ग्रामीण भागात भारनियमन केले जाते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून महावितरणतर्फे विविध खासगी व सरकारी कंपन्यांतर्फे विजेची खरेदी करण्यात येत आहे. तसेच मुबलक कोळसा व पाण्याचींही उपलब्ध असल्यामुळे राज्यातील विविध औष्णिक प्रकल्पांमध्येही विजेची निर्मिती होत आहे. त्यामुळे यंदा एप्रिल व मे महिन्यात विजेची मागणी वाढली तरी, ग्राहकांना विजेचा पुरवठा करण्यासाठी महावितरणने जानेवारी महिन्यापासून सर्व प्रकारचे नियोजन केले आहे.
इन्फो :
दिवसाला सतराशे मेगावॅटपर्यंत विजेची मागणी
महावितरणच्या जळगाव परिमंडळात येणाऱ्या जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्हा मिळून दिवसाला एकूण सरासरी दीड हजार ते सतराशे मेगावॅटपर्यंत विजेची मागणी असते. यामध्ये घरगुती, औद्योगिक कृषी व इतर सर्व ग्राहकांचा समावेश असतो. तर उन्हाळ्यात वातानुकूलित उपकरणांचा वापर जास्त होत असल्यामुळे दिवसाला अतिरिक्त २०० ते ३०० मेगावॅटपर्यंत.
विजेची मागणी जास्त राहत असल्याचे महावितरणतर्फे सांगण्यात आले.
इन्फो :
सध्या उन्हाळा सुरू झाला असला तरी, विजेची मागणी वाढलेली दिसून येत नाही. या पुढच्या काळात विजेची मागणी वाढली तरी, मुबलक वीज पुरवठा करण्यासाठी महावितरण सक्षम आहे. त्यामुळे खान्देशात यंदाच्या उन्हाळ्यात कुठेही भारनियमन होणार नाही. मात्र, नागरिकांनी थकीत वीजबिल भरून महावितरणला सहकार्य करावे.
दीपक कुमठेकर, मुख्य अभियंता, महावितरण