खान्देशातील जिनिंग उद्योगाला ५० कोटींचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2020 05:17 PM2020-04-12T17:17:06+5:302020-04-12T17:18:50+5:30
कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमध्ये खान्देशातील तिघा जिल्ह्यात दिडशेवर असलेल्या जिनिंंग उद्योग बंद असल्याने कोट्यवधींचा व्यवहार ठप्प झाला आहे.
शरदकुमार बन्सी
धरणगाव, जि.जळगाव : कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमध्ये खान्देशातील तिघा जिल्ह्यात दिडशेवर असलेल्या जिनिंंग उद्योग बंद असल्याने कोट्यवधींचा व्यवहार ठप्प झाला आहे. या लॉकडाऊन काळात जिनिंंग उद्योग बंद असला तरी सीसीवरील व्याज, कर्जावरील व्याज, कर्मचाऱ्यांंचे पगार तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गठाणच्या भावात झालेली घसरण यामुळे खान्देशातील जिनिंग उद्योगाला ५० कोटीचा फटका बसला आहे. कोरोनाने या सिजनमध्ये मोठा फटका दिल्याने उद्योजक चिंताग्रस्त झाले आहे.
कापूस उत्पादन वाढले, पण कोरोनामुळे घात
या वर्षी खान्देशात कापूस उत्पादन चांगले होते. त्यामुळे जिनींग उद्योगाची भरभराट होती. खान्देशातून दरवर्षी १८ ते २० लाखावर गाठ तयार होतात. या वर्षी २२ लाख गठाण तयार तयार होईल असा अंदाज होता. मात्र कोरोना लॉकडाऊन मुळे एक महिन्याची आवक कमी होऊन कमी माल खरेदी होणार असल्याने १५/१६ लाख गाठी तयार होतील, असा अंंदाज उद्योजकांनी व्यक्त केला आहे.
भाव घटल्याने फटका, दीड लाख गाठी पडून
कोरोना महामारीमुळे कापसाच्या गाठींचे भाव घटले आहेत, ज्या देशात गाठींची निर्यात होते त्या चीन, इंडोनेशिया, बांगलादेश, व्हियतनाममध्ये कोरोनाने थैमान घातल्याने यावर्षी कापसाच्या गाठीचे भाव वाढण्याची शक्यता कमीच आहे. आजच्या घडीला खान्देशातील जिनिंंगांमध्ये अदमासे दीड लाख गाठी पडून असल्याचे उद्योजकांचा अंदाज आहे. भाव कमी झाल्याचा प्रत्येक जिनर्सला याचा फटका बसला आहे.
जिनिंंग उद्योग बंद तरी खर्च सुरुच
लॉकडाऊनमुळे जिनिंंग उद्योग बंद असले तरी नियमित कर्मचारी पगार, वीज बील, कर्जावरील व्याज, सीसीवरील व्याज आदी खर्च सुरुच असल्याने जिनिंंग उद्योजक चिंताग्रस्त आहेत.
आठ हजार कामगार गावाकडे
खान्देशातील जिनिंंग उद्योगात अदमासे आठ हजार आदिवासी, पावरा व इतर मजूर काम करीत असून लॉकडाऊनमुळे हे मजूर आपापल्या गावाकडे निघून गेले असल्याने लॉकडाऊन उघडल्यावर हे मजूर केव्हा परत जिनिंगमध्ये कामाला येतील, याचीही चिंता उद्योजकांना इ.कारण मजूर आल्याशिवाय जिनींग मध्ये काम आवरणे अशक्यच असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे.
कोरोना महामारीमुळे झालेले लॉकडाऊन हे आपण सर्वांचा जीव वाचविण्यासाठी महत्वाचे आहे. मात्र लॉकडाऊनमुळे इतर उद्योगाप्रमाणे जिनींग उद्योगाला फटका बसला आहे. खान्देशात कोट्यवधीचा व्यवहार ठप्प झाला आहे. तसेच वीज बील, इतर कर्मचारी पगार, कर्जाचे, सीसीचे व्याज तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गठाणच्या भावात झालेल्या घसरणीमुळे खान्देशातील जिनिंंग उद्योगाला सुमारे ५० कोटींचा फटका बसला आहे. शेतीपूरक असलेल्या या उद्योगाचे लॉकडाऊन काळातील वीज बील, कर्जाचे व सीसीचे बँकेचे व्याज माफ केल्यास उद्योजकांना हातभार लागेल.
-जीवनसिंह बयस, जिनिंग चालक, धरणगाव