न्यूयॉर्क येथे खान्देश कन्यांनी जागवला राष्ट्राभिमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 09:18 PM2018-08-22T21:18:08+5:302018-08-22T21:19:42+5:30
बक्षिसाची रक्कम केरळच्या पूरग्रस्तांंसाठी देणार
चोपडा, जि.जळगाव : न्यूयॉर्क येथे १९ रोजी ७२व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘फेडरेशन आॅफ इंडिया असोसिएशन’ (एफआयए) द्वारा आयोजित इंडिया परेड या जगात सर्वात मोठ्या मानल्या जाणाऱ्या रॅलीत भारतातील विविध राज्यातून वेगवेगळ्या उद्देशाने अमेरिकेत गेलेल्या भारतीय बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यात महाराष्ट्रातील जल्लोष ग्रुपनेही सहभाग घेतला होता. या ग्रुपमध्ये चोपडा येथील शीतल महाजन, जळगाव येथील रंजीता वानखेडे व धुळे येथील परेश पवार यांनीही सहभाग घेऊन स्वदेशाभिमान व्यक्त केला.
न्यूयॉर्क, न्यूजर्सी, कनेक्टिकट स्टेटस मिळून इंडिया परेडचे आयोजन एफआयए गेल्या ३८ वर्षांपासून करीत आहे. या वेळी सुप्रसिद्ध अभिनेते कमल हसन, कन्या श्रुती हसन, अभिनेता अनुपम खेर, सुप्रसिद्ध गायक कैलास खेर आदी दिग्ग्ज अतिथी म्हणून उपस्थित होते.
न्यूयॉर्क येथे ३८ स्ट्रीट मॅडिसन अव्हेन्यू येथून रॅलीची सुरवात होऊन सांगता २३ स्ट्रीट मॅडिसन अव्हेन्यू येथे झाली. रॅलीत दीड लाख भारत प्रेमींनी सहभाग घेतला. महाराष्ट्रातील जल्लोष ग्रुप रॅलीत चित्तवेधक ठरला. रॅलीच्या माध्यमातून भारतीय संस्कृती, स्वदेशाभिमान व एकतेचे दर्शन घडविले. जल्लोषात विविध सांस्कृतिक कार्यक्रम झाले. श्रुती हसन यांच्या सहभागाने कैलास खेर यांच्या गायनाने कार्यक्रम उच्च शिखरावर पोहचला. या कार्यक्रमात मिळालेला निधी नैसर्गिक आपत्तीग्रस्त केरळमधील बांधवांसाठी देणार असल्याचा मनोदय जल्लोष ग्रुपने व्यक्त केला.