चोपड्यात खान्देशरत्न बहिणाबाई चौधरी साहित्य संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2019 11:16 PM2019-11-09T23:16:00+5:302019-11-09T23:16:28+5:30

साहित्यिक, कलावंतांच्या स्वागतासाठी नटली साहित्य नगरी

Khandesh Ratna sister-in-law Chaudhary Literature Meeting in Chopad today | चोपड्यात खान्देशरत्न बहिणाबाई चौधरी साहित्य संमेलन

चोपड्यात खान्देशरत्न बहिणाबाई चौधरी साहित्य संमेलन

Next



चोपडा - येथे महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुंबई व नगर वाचन मंदिर (तालुका वाचनालय) यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक नगरी चोपडा शहरात प्रथमच जिल्हास्तरीय साहित्य संमेलन आज होणार आहे. खान्देशरत्न बहिणाबाई चौधरी मराठी साहित्य संमेलन 'स्व.डॉ.सुशिलाबेन शहा साहित्य नगरी' परिसरात दजेर्दार साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. त्यासाठी राज्यासह परप्रांतातून मराठीचे सारस्वत कलावंत, साहित्यिक चोपडा नगरीत दाखल होत आहेत.
शहरातील स्व.डॉ.सौ.सुशिलाबेन शहा साहित्य नगरीमध्ये प्रथमच होत असलेल्या जिल्हास्तरीय ‘खान्देशरत्न बहिणाबाई चौधरी मराठी साहित्य संमेलन २०१९’चा उद्घाटन सोहळा सकाळी १० वाजता माजी विधानसभाध्यक्ष प्रा.अरुणभाई गुजराथी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होईल. उद्घाटन अ.भा.मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष व ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी (मुंबई) यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष साहित्यिक फ.मु.शिंदे (औरंगाबाद), साहित्यिक प्रा.डॉ.केशव देशमुख (नांदेड), महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य कवि अशोक सोनवणे (चोपडा), रमेश पवार (अमळनेर), भोपाळ (मध्यप्रदेश) येथील मराठी साहित्य अकादमीच्या नवनियुक्त निदेशिका आणि चोपड्याच्या सुकन्या पौर्णिमाबेन हुंडीवाले (ब-हाणपूर), अभिनेता शंभू पाटील (जळगाव), साहित्यिक कुंदा प्रधान (कोल्हापूर) हे उपस्थित राहणार आहेत.

विविध कार्यक्रमांचे नियोजन
या संमेलनात दुपारी एक वाजता ‘बोलीभाषांचे मराठी साहित्यात योगदान’ यासंदर्भात परिसंवाद होणार असून अध्यक्षस्थानी कविवर्य अशोक सोनवणे राहतील. तर परिसंवादात डॉ.रमेश सूर्यवंशी (कन्नड), प्रा.वि.दा.पिंगळे (पुणे), डॉ.मिलिंद बागूल (धरणगाव) हे सहभागी होणार आहेत.
यावेळी होणाऱ्या कविसंमेलनाचे अध्यक्षस्थान कविवर्य रमेश पवार (अमळनेर) हे भूषविणार आहेत. त्यात प्रा. एस.टी.कुलकर्णी, डॉ.संजिवकुमार सोनवणे, रमेश धनगर, कृपेश महाजन, दिनेश चव्हाण, संजय सोनार, राजेंद्र पारे, अरुण जोशी, ललिता पाटील, प्राचार्य योगिता पाटील, तुषार लोहार, विलास पाटील, किशोर नेवे, बाळकृष्ण सोनवणे, जया नेरे हे कवी सहभागी होणार आहेत. सुत्रसंचालन प्रा.डॉ.रमेश माने हे करणार आहेत.
दुपारी तीन वाजता साहित्यिक पौर्णिमाबेन हुंडीवाले यांचे कथाकथन होणार आहे. तर दुपारी चार वाजता अभिनेते शंभू पाटील यांचे ‘गांधीजी’ या विषयावर नाट्य अभिवाचन होणार आहे. ‘बहिणाबार्इंच्या काव्यात्मक जीवनाचा भावस्पर्शी प्रवास’ हा एकपात्री प्रयोग सांयकाळी सहा वाजता कुंदा प्रधान (कोल्हापूर) या सादर करणार आहेत. रात्री सात वाजता अपर्णा भट कासार (जळगाव) व समूहाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने साहित्य संमेलनाचा समारोप होईल.

रसिकांना आवाहन
आज महिला मंडळ माध्यमिक शाळेच्या प्रांगणावरील ‘स्व.डॉ.सुशिलाबेन शहा साहित्य नगरी’तील साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमात रसिक श्रोते, नाट्यप्रेमी आणि नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन नगर वाचन मंदिराचे अध्यक्ष आशिष गुजराथी, उपाध्यक्ष प्रा.एस.टी.कुलकर्णी, कार्यवाह गोविंद गुजराथी, डॉ.परेश टिल्लू, तसेच सर्व कार्यकारणी सदस्यांनी केले आहे.

Web Title: Khandesh Ratna sister-in-law Chaudhary Literature Meeting in Chopad today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.