चाळीसगाव येथे १० मार्चपासून ‘खान्देश संगीत महोत्सवा’चे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 01:24 PM2018-03-06T13:24:39+5:302018-03-06T13:24:39+5:30
ख्यातनाम कलावंतांची जुगलबंदी
आॅनलाइन लोकमत
चाळीसगाव, जि. जळगाव, दि. ६ - गुरुकुल प्रतिष्ठानतर्फे चाळीसगाव येथे एकदिवासीय खान्देश संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. १० रोजी सायंकाळी पाच वाजता राजपूत लोकमंगल कार्यालयात सुर - तालाची अपूर्व मेजवानी चाळीसगावकरांना अनुभवाता येणार आहे.
पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचे शिष्य बासरी वादक पंडीत विवेक सोनार हे चाळीसगावचे भूमीपुत्र. त्यांच्याच प्रयत्नातून संगीत महोत्सव होत असून यापूवीर्ही दोन वेळा असे कार्यक्रम झाले आहेत. पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी चाळीसगावी येऊन महोत्सवाचा पहिला सुर बासरीतून छेडला आहे. त्यांच्या अवीट बासरीची सुरावट येथील श्रोतृवृंदाने अनुभवली आहे.
१० रोजी धृपद गायक सागर मोराणकर धृपद गायन करतील. त्यांना पखवाजवर कृष्णा साळुंखे यांची साथसंगत असेल. पंडीत विवेक सोनार हे बासरी वादन करणार असून उस्ताद फजल कुरेशी त्यांना तबल्यावर साथसंगत करतील. पंडीत अमेरेंद्र धनेश्वर हे शास्त्रीय गायनाचे सुर छेडतील. त्यांना संवादिनीवर बापू चौधरी तर तबल्यावर निसर्ग देहुकर यांची साथसंगीत असेल.
ते सूर निरागस...
आपल्या शिष्याच्या आग्रहाखातर सुप्रसिद्ध बासरी वादक पंडीत हरिप्रसाद चौरसिया यांनी स्वत: चाळीसगावी येऊन पाच वषार्पूर्वी बासरी वादन केले आहे. 'बोलिये क्या सुनना चाहेंगे आप...' अशी प्रेमळ साद घालीत पंडित हरिप्रसाद यांनी एकाहुन एक सरस रागांचे निरागस सूर आळवून चाळीसगावकरांना मंत्रमुग्ध केले होते. गेल्या पाच वषार्पासून गुरुकुल प्रतिष्ठान तर्फे अधुन मधुन खान्देश संगीत महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. खान्देशातील उदयोन्मुख कलावंतांना प्रेरणा आणि व्यासपिठ मिळावे. यासाठीच महोत्सवाचे आयोजन केले जात असल्याची माहिती पंडीत विवेक सोनार यांनी 'लोकमत'शी बोलतांना दिली.