खान्देशातील आदिवासी सत्पुरुष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 12:31 AM2017-11-18T00:31:00+5:302017-11-18T00:31:39+5:30

‘लोकमत’च्या वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘खान्देशातील संतांची मांदियाळी’ या सदरात साहित्यिक प्राचार्य डॉ.विश्वास पाटील यांचा लेख ‘खान्देशातील आदिवासी सत्पुरुष’

Khandesh tribal Satpurush | खान्देशातील आदिवासी सत्पुरुष

खान्देशातील आदिवासी सत्पुरुष

Next

धुळय़ाजवळील चितोडचे श्री गणपत बाबा आणि किसन महाराज ही नावे यासंदर्भात विशिष्ट आहेत. किसन महाराज आंध्र प्रदेशात एस.आर.पी. म्हणून कार्यरत होते. त्यांची गुरुपरंपरा मध्य प्रदेशात होती. त्यांचे पिता हरीलाल पोलीस पाटील होते. ते योगसिद्ध संत हरी पंडित बोरसे यांच्या समकालीन होते. साक्री तालुक्यातील भामेर गावचे भावसिंग महाराज यांचा जन्म धुळे येथे 1901 साली झाला. त्यांचे गुरू माधवगीर उपाख्य माधवानंद महादेवानंद गिरनार येथे वस्तीला असलेले नागर ब्राrाण होते. जलाराम बाबा यांचे शिष्योत्तम श्याम भगत यांच्याशी गुजरातेत सत्ताधारा येथे त्यांची ज्ञानचर्चा झाली. महाराजांची हिंदी रचना फार मोठय़ा प्रमाणावर अप्रकाशित आहे. यातून ज्ञान, वैराग्य, निगरुण परंपरा आणि संतमताचा आग्रही दृष्टिकोन दिसून येतो. ही कविता आपले नाते निगरुण संत परंपरेशी सांगते. 22 ऑक्टोबर 1920 साली त्यांनी शहादा तालुक्यातील कवळीथ गावी समाधी घेतली. त्यांचे शिष्य भिका महाराज यांची समाधीही त्यांच्या समाधीनिकट आहे. तळोदेनजिक हिंडिबेच्या बनातल्या हिडिंबा मंदिरात श्यामजी महाराज असत. श्यामजी महाराज हे गुलाम महाराज यांचे बंधू रामदास महाराजांचे जावई होत. तळोदेनजिक अक्कलकुवा महामार्गावर सतोणे फाटा येतो. या मार्गावर बेज नावाचे गाव आहे. मूळ तापी नदीच्या काठावर असलेले हे गाव आता पुनर्वसनानंतर नवाबेज म्हणून ओळखले जाते. येथे गुलाम महाराज परंपरेतील आपश्री सोनजी पुना वळवी होते. यांचा जन्म 1 मार्च 1905 रोजी झाला. प्राथमिक शाळेत शिक्षक या नात्याने कार्यरत सोनजी गुरुजींनी खेकडे, गणेश बुधावल, करडे अशी सेवा बजावली. करडे येथूनच राजीनामा देऊन त्यांनी संतकार्याला वाहून घेतले. महाराजांचे गुरू सरस्वतीनंदन हे मध्य प्रदेशातील थांदला येथील निवासी असून त्यांचा झाबुआ येथे आश्रम आहे. केडिया डोंगर (गुजरात) येथील गंगादास बाबा आणि कर्नाटकच्या रूद्धनाथ बाबांचीही विशेष कृपा त्यांना संपादित करून घेता आली. 13 फेब्रुवारी 1980 साली त्यांनी समाधी घेतली. त्यांच्या पत्नी जेठीबाई यांचे 16 ऑगस्ट 1981 रोजी निर्वाण झाले. त्यांचीही समाधी महाराजांच्या समाधीच्या शेजारी आहे. सटाणापासून जवळच वीरगाव नावाचे एक स्थान आहे. तिथे हरी पंडित बोरसे यांचा जन्म झाला. पेशाने पोलीस असून त्यांचा मोठा कार्यकाळ नवापूर, शहादा, दोंडाईचा या परिसरात गेला. त्यांचे जीवन अद्भुत आणि आश्चर्यकारक प्रसंगांनी भरलेले आहे. मध्य प्रदेशातल्या खंडवा नजिकच्या भामागडच्या शांत, निर्मळ, एकाकी प्रदेशातील ब्रrानंद, शिवानंद ही त्यांची गुरुपरंपरा. शिवानंदांच्या नावाने सुप्रसिद्ध आरती ‘ओम जगदीश हरे’ आढळते. मध्य प्रदेशातील ब्रrागीर, मनरंगीर, सिंगाजी ही नावे निगरुण संत परंपरेतील आहेत. त्यांचा पोशाख शुभ्रधवल आणि चरित्र वैराग्यसंपन्न आहे. शिवानंदांची तर धुळय़ाच्या चक्करबर्डीवर येऊन शिष्यांना मार्गदर्शन करण्याची घटना प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातले संत नामदेव, मध्य प्रदेशातील हे संत मंडळ आणि थेट उत्तर प्रदेशातील निगरुणी स्वर हे भारतीय एकात्मतेचे मनोरम त्रिविध स्वरुप आहे. हरी पंडित बोरसे योगसिद्ध अधिकारी पुरूष होते. हरिबाबांच्या उपदेशाचा विषय योगविद्या निदर्शक असून, समाधी मार्गाची शिकवण देणारा आहे. त्यांच्यासोबतच हिराजी महाराज, बंसी महाराज, दौलत बाबा यांचीही हिंदी-मराठी कविता अप्रकाशित स्वरुपात आहे. हरी पंडित बोरसे हे नाव शहादा परिसरात योगविद्येचे जाणते शिक्षक आणि सद्गुरुंच्या रूपाने सर्वतोमुखी आहे. अनेक जाती-जमातीतील भक्तांना त्यांनी मार्गदर्शन केले. मोक्षमार्गाचीही दिंडी चालवली. आपल्या आयुष्यक्रमात त्यांनी अनेकांना दीक्षा दिली. योगविद्येचा भरपूर प्रसार-प्रचार केला. त्यांची आणि त्यांचे सुपुत्र काशिनाथ बाबा यांची समाधी वीरगाव येथे आहे. आदिवासी संत परंपरेतील आत्माराम रामलाल फुले हे सत्पुरुष शिंदखेडा निवासी असून, त्यांचे विपुल लेखन आहे. पित्याचे नाव रामलाल व आईचे नाव नज्याबाई आहे. 3 फेब्रुवारी 1926 साली त्यांचा जन्म झाला. पिता रामलाल रामभक्त असून ते वाल्मीकी रामायणाचे पारायण करत असत. प्रेमीचंद बाबांनी त्यांना तापीकाठावर सोनेवाडी गावात मारुती मंदिरात अनुग्रह दिला. पुढे त्यांचे चुलते श्यामलाल बाबांनीही त्यांना योगविद्येचे पाठ शिकवले. मराठी, हिंदी, अहिराणी या विविध भाषांमधून लेखन आहे. त्यांचे अनेक कार्यक्रम आकाशवाणी केंद्रांवरुनही प्रसारित झाले. ‘आत्माराम भजन प्रकाश’ खंड 1 आणि खंड 2, ‘आत्मगीता’ तथा ‘गुरु-शिष्य संवाद’ असे त्यांचे लेखन प्रकाशित असून, काही रचना अप्रकाशित असण्याची शक्यता आहे. शहादा तालुक्यातील टवळाई येथील धडोजी महाराजांची कविता शहादा येथील डॉ.कांतीलाल टाटिया यांच्याकडे उपलब्ध आहे.

Web Title: Khandesh tribal Satpurush

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.