खान्देशी वांग्यांची विदेशवारी, दररोज २० टन वांग्याचे भरीत फस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 12:23 PM2018-11-24T12:23:49+5:302018-11-24T12:24:22+5:30

थंडी वाढल्याने मागणी वाढली

Khandesh Vangazi, Untouchables, 20 Ton of Eggplant Every day | खान्देशी वांग्यांची विदेशवारी, दररोज २० टन वांग्याचे भरीत फस्त

खान्देशी वांग्यांची विदेशवारी, दररोज २० टन वांग्याचे भरीत फस्त

googlenewsNext
ठळक मुद्देनाशिक, पुण्यातही भरीत सेंटरतजेलदार वांग्यांना मागणी





विजयकुमार सैतवाल
जळगाव : गुलाबी थंडी जाणवू लागताच भरीताच्या वांग्यांनाही मागणी वाढू लागली असून तयार भरीताची विक्री वाढली आहे. जळगावातून दररोज सुमारे २० टन भरीताच्या वांग्यांची विक्री होत असून जिल्ह्यासह राज्यभरात येथून वांगे तसेच तयार भरीत रवाना होत आहे. इतकेच नव्हे येथील प्रसिद्ध वांगे अमेरिकासह इतर देशातही नातेवाईकांकडे पाठविण्यात येत आहेत.
जळगाव जिल्ह्यातील केळीसह भरीताचे वांगेही प्रसिद्ध आहेत. त्यात हिवाळ््यामध्ये जास्त मागणी असते ती भरीताच्या वांग्यांना. जळगाव जिल्ह्यातील वातावरण व जमीन वांग्यांसाठी पोषक असल्याने त्यांची जी विशिष्ट चव आहे, ती इतरत्र कोठेही मिळत नाही. त्यामुळे या वांग्यांना जास्त मागणी असते व ते येथेच मोठ्या प्रमाणात पिकविले जातात.
गेल्या काही वर्षापासून पावसाळ््यामध्येच भरीताचे वांगे बाजारात येऊ लागले आहेत. मात्र त्यांची खास चव लागते ती हिवाळ््यामध्ये. त्यामुळे थंडी वाढू लागली की या वांग्यांचीही मागणी वाढते.
वांग्यांची आवक वाढली
जळगाव जिल्ह्यात यावल तालुक्यातील बामणोद, भालोद, पाडळसे, जळगाव तालुक्यातील असोदा, भादली, ममुराबाद, इदगाव, कानळदा, रावेर तालुका तसेच वरणगाव, बोदवड तालुक्यांमध्ये भरीताच्या वांग्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. त्यात आता जामनेर तालुक्यातही काही भागांमध्ये भरीताच्या वांग्याची लागवड होऊ लागली आहे. सध्या जळगाव बाजार समितीमध्ये या वांग्यांची आवक वाढली असून दररोज २० टन वांग्यांची विक्री होत आहे.
भरीत केंद्रांवर अधिक मागणी
घरगुती भरीत करण्यासाठी तसेच हॉटेल चालकांकडून या वाग्यांची खरेदी होते. त्यात आता काही वर्षांपासून खास भरीत सेंटरही सुरू झाल्याने तेथे मोठ्या प्रमाणात वांग्यांना मागणी असते. जळगाव शहरात ५० च्यावर भरीत सेंटर आहेत. त्यामुळे या भरीत सेंटरवर वांग्यांना मोठी मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. सध्या घरी भरीत करण्यासह तयार भरीताला पसंती असल्याने त्याची विक्री वाढली आहे.
भरीत पार्ट्यांना प्रारंभ
जळगाव जिल्ह्यात हिवाळ्यात भरीत पार्ट्या मोठ्या प्रमाणात केल्या जातात. त्यास सुरुवात झाली असून सध्या घरी आलेल्या पाहुणे मंडळींना भरीताचा पाहुणचार केला जात आहे. या सोबतच लग्न असो अथवा कोणताही समारंभ तेथे इतर पदार्थांसह भरीताचा मेनू हमखास असतोच.
तजेलदार वांग्यांना मागणी
वांगे भाजल्यानंतर त्यामधून जास्त तेल सुटेल अशा वांग्यांना अधिक मागणी असते. यासाठी जळगाव जिल्ह्यातील बामणोद, असोदा, भादली या भागातील वांगे प्रसिद्ध आहेत. असोदा येथे तर पिढ्यांपिढ्यांपासून भरीताच्या वांग्यांची शेती केली जात आहे.
राज्यभर दरवळ
जळगावसह खान्देशासह नाशिक, पुणे येथेही भरीत सेंटर सुरू झाले आहेत. या सोबतच मुंबई, डोंबविली, कल्याण, गोरेगाव येथेही भरीताचे वांगे पोहचत आहे. पुणे येथे पिंपरी, चिंचवड, सांगवी या भागात खान्देशातील मंडळी मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असल्याने तेथे जळगावातून ट्रॅव्हल्सद्वारे वांगे पाठविले जातात व तेथील बाजारातही खान्देशी भरीताचे वांगे दिसू लागले आहेत.
भरीताच्या वांग्यांची विदेशवारी
जळगाव जिल्ह्यातील अनेक मंडळी अमेरिका तसेच इतर देशांमध्ये वास्तव्यास आहे. ही मंडळी हिवाळ््यामध्ये येथे आली अथवा येथील नातेवाईक त्यांच्याकडे गेले तर सोबत हमखास वांगे अथवा भरीत घेऊन जात असतात.

भौगोलिक मानांकन; १५० देशांमध्ये वांग्यांच्या निर्यातीचा मार्ग मोकळा
भरीताचे वांगे दोन रुपये प्र्रति किलोपर्यंत घसरतात. त्यामुळे उत्पादकांना मोठा फटका बसतो. यासाठी या वांग्यांना रास्त भाव मिळावा म्हणून जळगाव तालुक्यातील असोदा येथील नवनिर्मिती शेतकरी मंडळाच्या वतीने यासाठी प्रयत्न केले जात असून या मंडळाने या वांग्यांना भौगोलिक मानांकन (जीआय) मिळविले आहे. यामुळे १५० देशांमध्ये वांग्यांच्या निर्यातीचा मार्ग मोकळा होणार असून त्यास भाव मिळण्यासही मदत होऊ शकेल.
उशिरा आगमन
यंदा पाऊस उशिरा झाल्याने भरीताच्या वांग्याचे उत्पादनही लांबणीवर पडले. परिणामी दरवर्षापेक्षा यंदा बाजारात भरीताचे वांगे उशिरा आल्याचे वांगे उत्पादकांनी सांगितले. सध्या या वांग्याचे होलसेलचे भाव १५ रुपये प्रति किलो आहे तर किरकोळ बाजारात ३० रुपये प्रती किलोने वांगे विक्री होत आहेत. भरीत सेंटरवर १२० रुपये प्रती किलो तयार भरीत मिळत आहे.
असोदेकरांना रोजगार, मात्र शेंडे आळीने वाढविली चिंता
असोदा येथे तर खास तुरकाठ्यांवर (काड्यांवर) भरीताचे वांगे भाजून मिळत असून तेथून कच्चे भरीत घेऊन जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे असोदेकरांना एक चांगला रोजगार या वांग्यांनी मिळून दिला आहे. मात्र या वांग्यांवर पडणाºया शेंडे आळीच्या प्रादुर्भावाने चिंता वाढविली असून त्याच्याप्रतिबंधासाठी उपाययोजना करण्याचीही मागणी नवनिर्मिती शेतकरी मंडळाने केली आहे.

जळगाव जिल्ह्यातील पूरक वातावरणामुळे येथील वांग्यांना विशिष्ट चव असते. सध्या त्यांची आवक वाढण्यासह मागणीही वाढली आहे.
-किशोर चौधरी, वांगे उत्पादक, असोदा

Web Title: Khandesh Vangazi, Untouchables, 20 Ton of Eggplant Every day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.