ममुराबादला खंडोबाचा यात्रोत्सव रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:19 AM2021-02-25T04:19:03+5:302021-02-25T04:19:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ममुराबाद : सुमारे साडेतीनशे वर्षांची परंपरा असलेला गावातील प्रतिजेजुरी खंडेराव देवस्थानचा यात्रोत्सव दरवर्षी माघ पौर्णिमेला मोठ्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ममुराबाद : सुमारे साडेतीनशे वर्षांची परंपरा असलेला गावातील प्रतिजेजुरी खंडेराव देवस्थानचा यात्रोत्सव दरवर्षी माघ पौर्णिमेला मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. कोरोनाची स्थिती लक्षात यंदा हा यात्रोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यात्रेनिमित्त ओढल्या जाणाऱ्या मानाच्या बारागाड्याही थांबविण्यात आल्या आहेत.
जेजुरीचे प्रतिरूप मानल्या जाणाऱ्या ममुराबाद येथील खंडेराव देवस्थानाची यात्रा यंदा येत्या शुक्रवारी व शनिवारी आयोजित करण्यात आली होती. त्यानिमित्त पहिल्या दिवशी यात्रेचे विशेष आकर्षण असणाऱ्या बारागाड्या ओढण्याचे नियोजन भक्त मंडळींनी केले होते. परंतु, यात्रा अवघ्या तीन-चार दिवसांवर येऊन ठेपलेली असताना गावात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने भक्तमंडळी तसेच ग्रामपंचायतीला गर्दी टाळण्यासाठी यात्रा थांबविण्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नाही. सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील व पत्रकार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत त्यासंदर्भात विचारविनिमय करण्यात आला. बैठकीत झालेल्या निर्णयानुसार यंदा यात्रेच्या ठिकाणी मिठाई, खेळणी, संसार उपयोगी भांडी वगैरेची दुकाने थाटण्यास मनाई आहे. पाळणा व पालखी यांनाही मज्जाव करण्यात आला आहे. यात्रेच्या दिवशी मंदिर दर्शनासाठी खुले राहील. मात्र, जास्त गर्दी उसळल्यास नाईलाजाने ते बंद केले जाईल. भाविकांना तोंडाला मास्क लावल्याशिवाय मंदिरात प्रवेश मिळणार नाही, असे ठरविण्यात आले.
चहासाठी कपबशी वापरल्यास दंड
दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी गावातील चहा- नाश्त्याच्या हॉटेल्स, बिर्याणी, पाणीपुरी व अंडापावच्या गाड्या तसेच रसवंती चालकांसाठी नवीन नियमावली तयार करण्यात आली. त्यानुसार हॉटेल्सवर चहा पिण्यासाठी यापुढे कपबशी किंवा काचेचे ग्लास वापरण्यास मनाई केली आहे. याशिवाय नाश्त्यासाठी कागदी डिस्पोजल प्लेट वापरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नियम न पाळणाऱ्यांना जागेवर एक हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे.