बहर लागण्याच्या अवस्थेत खरिपातील पिके तहानलेलीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:07 AM2021-08-02T04:07:12+5:302021-08-02T04:07:12+5:30
साधारणपणे आषाढ महिना लागला म्हणजे डोक्यावर आभाळ आले तरी ते जमिनीवर तुटून पडत. आषाढसरीच्या रूपातून बरसत राहते. याचा लाभ ...
साधारणपणे आषाढ महिना लागला म्हणजे डोक्यावर आभाळ आले तरी ते जमिनीवर तुटून पडत. आषाढसरीच्या रूपातून बरसत राहते. याचा लाभ नेमक्या याच काळातील पीकवाढीच्या अवस्थेत होतो. आषाढात सुरुवातीला तसा पाऊस झाला. यातही काही भाग कोरडा राहिला. तेथे पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे. आषाढातील प्रथम पंधरवड्यात पाऊस झालेल्या भागात आता सर्वच पीक बहर लागण्याच्या अवस्थेत आहे.
आता एक चांगल्या पावसाची गरज असताना आषाढ उत्तरार्धात कोरडा जातोय. आकाशात ढग चांगले जमून येतात, पण त्यापाठोपाठ जोरदार वारे ढग पळवून नेत आहेत. मागील दोन-चार दिवसांपासून तर वारा बेफाम झाल्यागत वाहत आहे. यामुळे जमिनीची ओल सुकत ती भेगा धरत आहे. कडक होत आहे.
यावर्षी मान्सूनपूर्व कपाशीचे क्षेत्र अधिक आहे. या क्षेत्रावर फुलफुगडी, कैऱ्या लागत आहेत. कपाशी खालोखाल मका क्षेत्र आहे. मका तुरा काढण्याच्या अवस्थेत आहे. बाजरी, सोयाबीन, कडधान्य आदी पिके फुलोरा ते शेंगा पक्व होण्याच्या अवस्थेत आहेत. ज्वारीने पान फिरविले आहे. उशिराने पाऊस सुरू झालेल्या भागात खरीप पीकवाढीच्या अवस्थेत आहे. या सर्वच पिकात उत्पादनवाढीसाठी एक चांगला पाऊस आवश्यक आहे.
आषाढात सुरुवातीला झालेल्या पावसाने तापमान, उकाडा कमी झाला खरा; पण अधिकवेळ आभाळ आभ्राच्छादित राहत आहे. मधूनच ऊन, वारे व अंगण ओले होईल इतपतच पाऊस पडतो. यामुळे पिकांबरोबरच, गुरेढोरे, शेतकऱ्यांनादेखील हे हवामान बाधत आहे. तापमान कमी असल्याने मान्सूनपूर्व कपाशीवर अजूनतरी फुलकिड्यांचा प्रादुर्भाव फारसा झालेला नाही, असे शेतकरी सांगत आहे.
संपूर्ण गिरणा लाभक्षेत्रच वाऱ्यावर
यावर्षी गिरणा नदीच्या एकूणच खोऱ्यात पाऊस कमी आहे. मागील दोन वर्षे जुलैमध्येच गिरणा धरण जलसाठ्यात वाढ होते. १० टक्के भरण्याची ऑगस्ट क्रांती झाली होती. यावर्षी जलसाठ्यात तूट आहे. गिरणा धरणात फक्त ३८ टक्के जलसाठा आहे, तर गिरणा नदीवरील नाशिक जिल्ह्यातील चणकापूर धरणात ४६ टक्के तर मोसम नदीवरील हरणबारी धरणात ७८ टक्के जलसाठा झाल्याची माहिती आहे. या धरणांच्या लाभक्षेत्रातदेखील कमी पावसाची स्थिती आहे. नेहमी गिरणा धरण ऑगस्ट महिन्यात भरते. यानुसार श्रावण महिन्यात जलरूपी अभिषेक या लाभक्षेत्रात होतो.
वाहणारे वारे एकतर पाऊस आणतील नाहीतर पाऊस पळवतील. मान्सूनपूर्व कपाशीला सिंचनासाठी सरी पाडून ठेवल्या आहेत. परंतु पाटपाण्यापेक्षा पावसाचे पाणी पिकांना अमृतसमान असते. यामुळे एक चांगल्या पावसाची आवश्यकता आहे.
-शिवाजी माधवराव हिरे, शेतकरी, खेडगाव
वाहणाऱ्या वाऱ्यामुळे शेतजमीन कोरडी होते. खरीप पिकांना ताण, शाॅक बसणार आहे. यानंतर याचा परिणाम होत पाऊस आल्यावर फुलफुगडी, पात्यागळ संभवते.
-उत्तम रामभाऊ पाटील, शेतकरी, बात्सर