जळगाव जिल्ह्यात ५ हजार हेक्टरवरील खरीप हंगाम धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 12:25 PM2018-08-10T12:25:46+5:302018-08-10T12:26:59+5:30
पावसाच्या दडीने शेतकरी हवालदिल
अजय पाटील
जळगाव : जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्यामुळे सुमारे ५ हजार हेक्टरवरील खरीप हंगाम धोक्यात आला आहे. पिकांच्या वाढीच्या अवस्थेतच पावसाने दडी मारल्याने पिकांची वाढही खुंटली आहे. त्यामुळे उडीद, मूग, सोयाबीन, ज्वारी या पिकांच्या ५० टक्के उत्पादनात घट होणार आहे. अजून आठवडाभर पावसाने पाठ फिरवल्यास खरीप हंगाम पूर्ण वाया जाण्याची भिती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीपेक्षाही कमी पाऊस झाला आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीला काहीसा पाऊस झाला मात्र, २७ जुलैपासून जिल्ह्णात पावसाची हजेरी नाही. त्यामुळे जिल्ह्णातील हलक्या जमिनीवरील पिकांची स्थिती अतिशय नाजूक झाली आहे. जुलैमध्ये पाऊस झाल्यामुळे सोयाबीन, उडीद व मूग या पिकांची स्थिती चांगली होती. मात्र, पिकांच्या ऐन वाढीच्या काळातच पावसाने दडी मारल्याने पिकांची वाढ खुंटली. सोयाबीन, उडीदाचा फुलोरा देखील गळून पडून पडत आहे. आता पाऊस झाला तरी सोयाबीन, उडीद, मूूग या पिकांच्या उत्पादनात एकरी दोन क्विंटलने घट ही निश्चित आहे. शेतकऱ्यांना उंबरठा उत्पादन देखील मिळण्याची शक्यता नाही.
आठ दिवसात पाऊस न झाल्यास खरीप हंगाम वाया जाणार
पावसाने दडी मारल्याने सध्या हलक्या जमिनीवर लागवड झालेला ५ हजार हेक्टरवरील खरीप हंगाम धोक्यात असून, अजून आठ दिवस पावसाने दडी मारल्यास जिल्ह्णातील ११ ते १२ हजार हेक्टरवरील खरीप हंगाम वाया जाण्याचा अंदाज आहे. काळी माती असलेल्या भागातील पिकांनी सध्या तग धरला असला तरी हलक्या जमिनीवरील पिकांची स्थिती खूप नाजूक आहे. काही शेतकºयांनी इतर बागायतदार शेतकºयांकडून पाणी घेत पिकांना पाणी दिले असलेतरी पिकांचीस्थिती सुधारलेली नाही.
केळी, कापसाच्या उत्पादनावरही होणार परिणाम
खरीप हंगामासह पावसाअभावी केळी व कापसावर देखील परिणाम होणार आहे. कापूस लागवड झाल्यानंतर फुलोराच्या काळातच कापसावर बोंडअळी, मोहाचा प्रादुर्भाव वाढला आहे. तसेच पावसाअभावी कापसाची वाढ खुंटली आहे. कोरडवाहू जमिनीवरील कापसासह बागायती कापसाच्या पिकावर देखील परिणाम झाला आहे. तसेच केळीच्या निसवनीच्या काळातच पाऊस नसल्याने ‘अमृतपाणी’ मिळत नसल्याने केळीच्या घड येण्याची प्रक्रिया थांबली असल्याने केळी उत्पादकांना फटका बसणार आहे.
आॅगस्ट महिन्यात पाऊसच नाही
खरीप हंगामासाठी जुलैमध्ये सरासरी २०६ मीमी पावसाची गरज असते. मात्र, जुलैमध्ये जिल्ह्णात १३० मिमी पाऊस झाला. आॅगस्टमध्ये १८७ मीमीची गरज असते, मात्र आॅगस्टमध्ये पाऊसच नसल्याने बळीराजाच्या चिंतेत भर पडली आहे.
भडगाव, चाळीसगाव, पाचोरा, भुसावळ, यावल, अमळनेर, पारोळा, जामनेर या तालुक्यांसह जळगाव तालुक्यातील काही भागांमधील खरीप हंगामाला सर्वाधिक फटका बसला असून, कृषी विभागाकडून भडगाव तालुक्यातील काही ठिकाणी पाहणी केली असता जमिनीला भेगा पडायला सुरुवात झाली असल्याची माहिती कृषी विभागाचे उपसंचालक अनिल भोकरे यांनी दिली.
पावसाअभावी जिल्ह्यातील ४ ते ५ हजार हेक्टर खरीपाचा हंगामावर परिणाम झाला आहे. तसेच अजून काही दिवस पावसाने पाठ फिरवली तर खरीप हंगामावर मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहे. हलक्या जमिनीवरील पिकांची स्थिती खूप नाजूक आहे. सोयाबीन, उडीद व मूग या पिकांची वाढ खुंटल्याने उत्पादनात देखील घट होण्याची शक्यता आहे.
-अनिल भोकरे, उपसंचालक, कृषी विभाग
जुलै महिन्यात पाऊस झाला असला तरी पिकांच्या वाढीच्या काळात पावसाने पाठ फिरवल्याने शेतकºयांचा संपूर्ण खरीप हंगाम वाया गेला आहे. आता पाऊस झाला तरी त्याचा फारसा फायदा होणार नाही. कारण खरीप हंगामातील निम्म्याहून अधिक उत्पादनात घट झाली आहे. मात्र, परतीचा पाऊस झाल्यास रब्बीच्या हंगामासाठी लाभदायक ठरू शकतो.
-कपील चौधरी, शेतकरी