मन्याड परिसरातील खरीप हंगाम धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 07:13 PM2019-07-19T19:13:37+5:302019-07-19T19:15:29+5:30
पावसाळा सुरू होऊन अर्धा संपला तरीदेखील मन्याड परिसरात दमदार पाऊसच न झाल्याने परिसरातील खरीप हंगाम धोक्यात आला आहे. शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या सर्वच पिकांनी माना टाकल्याने खरीप हंगामाचा पूर्ण बोजवारा उडाला आहे.
विजय पाटील
आडगाव, ता.चाळीसगाव, जि.जळगाव : पावसाळा सुरू होऊन अर्धा संपला तरीदेखील मन्याड परिसरात दमदार पाऊसच न झाल्याने परिसरातील खरीप हंगाम धोक्यात आला आहे. शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या सर्वच पिकांनी माना टाकल्याने खरीप हंगामाचा पूर्ण बोजवारा उडाला आहे. आतापर्यंत अर्ध्या तासाचे फक्त दोनच पाऊस झाले तेही मध्यम स्वरूपाचे होते. या दोनच पावसावर परिरसरातील शेतकºयांनी खरीप हंगामातील कपाशी, मका, बाजरी, ज्वारी, उडीद, मूग, तूर यांची लागवड केली. या पिकांची लागवड झाल्यापासून फक्त रिमझीम पाऊस झाला. या रिमझीमवर जीवदान धरून बसलेल्या पिकांवर पाच/सहा दिवसांपासून अस्मानी संकट घेऊन आलेल्या कडक ऊन व वाºयाने सर्वच पिकांना कोमात नेऊन टाकले.
कपाशी जमीन सोडेना
परिसरातील शेतकºयांचे नगदी पीक म्हणजे कपाशी. जेमतेम पावसांवर शेतकºयांनी कपाशी लावली. रिमझीम पावसाने कपाशीचा उतारा झाला. परंतु उतारा झाल्यानंतर त्याच्यावर दमदार पाऊसच न झाल्याने जमिनीत थोडीफार ओल तोपर्यंत कपाशीने चाल केली. आता ओलच नाहीशी झाल्याने कपाशीची वाढ खुंटली. त्यामुळे ८० टक्के शेतकºयांंची कपाशी तीन/चार पालावर आहे. २० टक्के शेतकरी की ज्यांच्याकडे थोडेफार पाणी होते अशा शेतकºयांची कपाशी दीड/दोन फुटाची झाली. परंतु या कपाशींवर करपा, लाल्या रोगाचे लक्षण दिसत असल्याने दुष्काळात तेरावा महिन्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.
मका करपू लागली
परिसरातील शेतकºयांनी कपाशीबरोबर या वर्षी मक्याचे क्षेत्रदेखील वाढविले. कारण चाराटंचाईने चांगल्या चांगल्या शेतकºयांना घाम फुटल्याने खरीपात गुरांसाठी मक्याचा चारा कामात येईल म्हणून बहुतेक शेतकºयांनी बागायती कोरडवाहू मक्याचे वाण लावले. परंतु समाधानकारक पाऊस नसल्याने मका उन्हाने करपून सुकू लागला आहे. दुसरीकडे गुरांसाठी लवकर चारा व्हावा म्हणून शाळू, दादर टाकले. तेही पाण्याअभावी सुकू लागले आहे. तसेच करपलेल्या मकावर लष्करी अळीने हंगामा केल्याने लावलेल्या पिकांची पूर्ण वाट लागली, अशी भयानक स्थिती परिसरात निर्माण झाली आहे.
विहिरी, नदी, नाले कोरडेच
अर्धा पावसाळा संपला तरीदेखील परिसरातील विहिरी, नदी, नाले कोरडेठाक आहेत. उन्हाळ्यात दुष्काळ होता म्हणून शेतकºयांनी पाणीटंचाईला व चाराटंचाईला मोठ्या संकटाने तोंड दिले. परंतु आता पावसाळ्यातही दुष्काळ नामशेष होत नसल्याने अजूनही त्याच संकटांना तोंड द्यावे लागत आहे. लेटलतीफ पावसाळा यावर्षी उशिरा का होईना परंतु चांगला होईल, अशी आशा बाळगून असलेल्या शेतकºयांची सध्याच्या वातावरणावरून घोर निराशा झाली. गेले ते दिवस बरे गेले, पुढे काही खरे नाही, असेच म्हणण्याची वेळ सध्या परिसरातील शेतकºयांंवर आली आहे.
चारा व ढेपेचे भाव भिडले गगनाला
गेल्या नऊ ते १० महिन्यांपासून परिसरातील शेतकºयांंना चारा व पाणी असा दुहेरी सामना करताना पार नाकेनऊ आणले. चारा म्हणून पाऊण लाखापासून तर दीड/दोन लाखापर्यंत विकत घ्यावा लागला तर पाण्याचे टँंकर पाच-पाच, दहा-दहा हजारांचे पाणी विकत घेऊन गुरांना पोसावे लागले. अजूनही या दोन्ही समस्या ‘जैसे थे’ आहेत. अर्धा जुलै महिना संपला तरी शेतकºयांचा वनवास अजून संपला नाही. ढेपदेखील चार/पाच महिन्यांपासून १७०० ते १९०० रुपयांप्र्रमाणे पोते असून, नेमके गुरांना जगवायचे कसे असा प्रश्न पडला आहे. चारा व पाणीटंचाईबाबत ‘लोकमत’ने वेळोवेळी पाठपुरावा केला तरी प्रशासनाने परिसरात ना चारा छावणी सुरू केली, ना पाण्याची काही व्यवस्था केली. प्रशासनाच्या या भूमिकेविरूध्द शेतकºयांंमध्ये संतापाची लाट आहे.
दीड ऐकर कपाशीवर शेतकºयाने फिरविला रोटाव्हेटर
पाण्यावाचून रानोरान पिकांची लाहीलाही होत असल्याने कपाशी व मका पीक पाहून शेतकरी पार अस्वस्थ झाला आहे. या पिकांची पूर्ण वाट लागली. देवाला असेच करायचे होते मग घरातले का शेतात टाकायला लावले, असा गंभीर प्रश्न आता शेतकºयांना पडला आहे. या पिकांना जबरदस्त शॉक बसला आहे. अशाच निराशेतून आडगाव येथील शेतकरी नारायण निंबा पाटील याने दीड ऐकर कपाशीवर रोटाव्हेटर फिरविला. त्याच्या आदल्या दिवशी सुभाष पाटील या शेतकºयाने एक हेक्टर डाळींबाची बाग उपटून फेकल्याची घटना ताजी असताना दुसºया दिवशी म्हणजे दि.१९ रोजी शेतकºयाने कपाशीवर रोटाव्हेटर फिरविला.