खरीप हंगाम शेवटपर्यंत तहानलेलाच
By ram.jadhav | Published: September 19, 2017 11:21 PM2017-09-19T23:21:59+5:302017-09-19T23:24:55+5:30
कर्जबाजारी शेतकरी अजूनच आर्थिक संकटात सापडला गेला़ मात्र त्याचे सोयरसुतक कुणालाही नाही़
राम जाधव
आॅनलाईन लोकमत, जळगाव, दि़ १९ -
शेतकºयांनी नेहमीप्रमाणेच अपेक्षा ठेवून मोठ्या आशेने खरिपाच्या हंगामाची लागवड केली़ परंतु सुरुवातीपासून पावसाने हुलकावणी दिल्याने जिल्ह्याच्या अनेक भागात दुबार तर काही ठिकाणी तिसºयांदा पेरणी करावी लागली़ त्यामुळे कर्जबाजारी शेतकरी अजूनच आर्थिक संकटात सापडला गेला़ मात्र त्याचे सोयरसुतक कुणालाही नाही़
या हंगामातील खरीप पिकांची परिस्थिती फारसी काही चांगली नाही़ त्यामुळे या वर्षीच्या खरीप हंगामाचे उत्पादन ३० ते ४० टक्क्यांपेक्षा जास्त घटणार आहे, यात शंका नाही़ पावसाने पाठ फिरवल्याने सर्वच पिके सलाईनवर जगत आलेले आहेत़ त्यामुळे यावर्षी पुन्हा एकदा बळीराजाचा ‘बळी’ जात आहे, हे निश्चित़
आता परतीचा पाऊस जरी काही भागात पडत असला, तरी मध्यंतरीच्या मोठ्या खंडामुळे पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटणार आहे़ तग धरलेल्या पिकांना मात्र या पावसाचा शवेटी काहीतरी फायदा होईल़
मक्याचे उत्पादन कमीच
मका पिकाच्या ऐन वाढीच्या काळात व दाणे भरण्याच्या वेळी पाण्याचा ताण पडल्याने दाणे अपूर्ण भरले आहे़ त्यामुळे कणसाचा आकार लहान राहिला आहे़ तसेच खोड अळींचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पन्नात घट येणार आहे़ या पिकावर मावा व कणसामध्ये खोडकिडीचा प्रादुर्भाव झालेला आहे़
आला तो नुकसान करून गेला
गेल्या आठवड्यात नंदुरबार जिल्ह्यातील काही भागात व जामनेर तालुक्यातील वाकोद परिसरात जवळपास सात ते आठ गावांमध्ये वादळी वाºयासह झालेल्या मुसळधार पावसाने मक्याचे उभे पीक आडवे झाले आहे़ तर याच भागातील कपाशी, ऊस या पिकांसह खरिपाच्या सर्वच पिकांचे वादळी पावसात नुकसान झाले आहे़ त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेने हिरावला गेला व लावलेला खर्चही गेला़ अशाप्रकारे तूर, भुईमूग, तीळ, सोयाबीनसह जवळपास सर्वच पिकांची या हंगामात बिकट स्थिती आहे़
उडीद व मुगाचे उत्पादन कमीच
उडीद व मुगावर रसशोषक किडी, पाने खाणारी अळी व पिवळा विषाणू रोगाचा प्रादुर्भाव होता़ त्यातच शेंगा आलेल्या असताना पावसाने रिपरिप लावली, त्यामुळे आलेल्या शेंगा खराब झाल्या़ नंतर पुन्हा पावसाची गरज असताना मात्र पावसाने उघडीप दिली़ यामुळे यावर्षी उडीद व मुगाचे सरासरीपेक्षा ३० ते ४० टक्क्यांपर्यंत उत्पन्न घटले आहे़ त्यातच आहे, त्याही मालाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त झालेले आहेत़
काही भागात जुलैच्या पहिल्या व दुसºया आठवड्यात खरिपाची पेरणी झाली़ तर काही भागात पाऊसमान व नैसर्गिक स्थितीही चांगली नसल्याने काही शेतकºयांनी पेरणी करण्यापेक्षा जमिनी पडीत ठेवल्याचीही स्थिती जामनेर तालुक्यात आहे़
हंगामाच्या सुरुवातीला लागवड केल्यानंतर पावसाची अनियमितता असल्याने पिकांच्या वाढीवर त्याचा परिणाम झाला़ मात्र मध्यंतरी आॅगस्टमध्ये रिमझिम बरसलेल्या श्रावणधारांमुळे काही भागात पिकांना जीवदान मिळाले़ पुन्हा आॅगस्टच्या शेवटी पावसाने हुलकावणी दिली़ त्यामुळे ऐन दाणे भरण्याच्या व फुले पात्या बनण्याच्या काळात पिकांना पाण्याचा झटका बसल्यामुळे उत्पादन क्षमतेवर परिणाम झाला आहे़
कपाशीवर किडींचा प्रादुर्भाव जास्त
जेव्हा पावसाने उघडीप दिली, त्या काळात कपाशीवर मोठ्या प्रमाणावर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव झाला़ यामध्ये मावा, तुडतुडे, थ्रिप्स, पिठ्या ढेकूण (मिली बग), पांढरी माशी तर काही भागात गुलाबी बोंडअळीसह पाने खाणाºया अळींचाही प्रादुर्भाव आढळून आला़ यामुळे कपाशीच्या पिकावर याचा परिणाम होऊन कपाशीचे उत्पादन घटणार
गिरणा परिसरात कपाशीचे पीक पाण्याअभावी करपून जात आहे़ हलक्या जमिनीवरील पीक तर अक्षरश: वायाच गेले आहे़ भारी जमिनीवरील कपाशी कशीबशी तग धरून आहे. मात्र तिच्याही उत्पन्नावर परिणाम होत आहे़ जिल्ह्यात पाऊस अनियमित व अनिश्चित आहे़ नुकत्याच केलेल्या नजर अंदाजानुसार खरीप हंगामातील सर्व पिकांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे़ त्यामुळे या हंगामात शेतकºयांचे उत्पन्न घटणार आहे़ पिकांच्या ऐन जोमाच्या काळात पावसाने उघडीप दिल्याने उत्पन्न घटण्याचा अंदाज आहे़
- अनिल भोकरे, कृषी उपसंचालक, जळगाव़
यावर्षी मोठ्या अपेक्षेने खर्च करून पिकांची लागवड केली होती़ मात्र निसर्गाने सर्व अपेक्षांवर पाणी फेरले़ सरतेशेवटी आलेल्या वादळी पावसाने होते नव्हते, ते सर्व पुन्हा वाया गेले़
- प्रकाशचंद जैन, शेतकरी, माजी सरपंच वाकोद