पावसाने डोळे वटारल्याने खरिपाच्या पेरण्या धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:13 AM2021-07-05T04:13:01+5:302021-07-05T04:13:01+5:30
रावेर : गत आठ-दहा दिवसांपासून पावसाने डोळे वटारल्याने व सूर्य आग ओकत असल्याने, खरिपाच्या तडीस गेलेल्या पेरण्या दुबार ...
रावेर : गत आठ-दहा दिवसांपासून पावसाने डोळे वटारल्याने व सूर्य आग ओकत असल्याने, खरिपाच्या तडीस गेलेल्या पेरण्या दुबार पेरणीच्या संकटात सापडल्याने शेतकरी वर्ग कमालीचा हवालदिल झाला आहे. पावसाअभावी बीजांकुरण झालेल्या पिकांची वाढ खुंटल्याने चिमण्या पाखरांनी बीजांकुरण पावलेल्या मक्याची कोवळी पिके उखडून मुळाशी असलेला बीजांकुराचा नरम दाणा खाऊन शिवार उजाड करीत आहेत. यामुळे शेतकर्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.
आर्द्रा नक्षत्रात झालेल्या दोन-तीन पावसांमुळे खरिपाच्या ३१ हजार हेक्टर क्षेत्रात खरिपाची पेरणी पूर्ण होऊन खरिपाची पेरणी त्या सातत्यपूर्ण पावसाने मार्गी लागल्या. मात्र, बीजांकुर शेतीमाउलीच्या कुशीतून सूर्यप्रकाशाचा वेध घेऊ लागताच, पावसाने तब्बल आठ ते दहा दिवसांपासून कोरड ओढून दडी मारली आहे. यामुळे खरिपाची उगवण झालेली कोवळी पिके पावसाअभावी दुबार पेरणीच्या संकटात सापडली आहेत. ज्वारी, मका, सोयाबीन, भुईमूग, कपाशी, तूर, उडीद, मूग ही खरिपाची कोवळी पिके उन्हात कोमेजत असल्याने पावसासाठी आसुसलेले आहेत.
दुसरीकडे रानपाखरांना जंगलात कोणत्याही प्रकारचे खाद्य नसल्याने, पहाटे व सांजवेळी पक्ष्यांचे थवेचे थवे खरिपाच्या मका व ज्वारीच्या कोवळ्या पिकांवर धाड टाकून मुळाशी असलेले बीजांकुराचे नरम झालेले दाणे खाण्यासाठी पेरणी झालेले शिवार उजाड करीत आहेत.