खेलरत्न पुरस्कार अर्जासाठी उद्यापर्यंत मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:12 AM2021-06-27T04:12:47+5:302021-06-27T04:12:47+5:30
साहसी पुरस्कारासाठी १ जुलैपर्यंत अर्जांची मुदत जळगाव : केंद्रीय युवा कार्यक्रम व खेल मंत्रालयाद्वारे तेनसिंग नॉर्गे राष्ट्रीय साहसी ...
साहसी पुरस्कारासाठी १ जुलैपर्यंत अर्जांची मुदत
जळगाव : केंद्रीय युवा कार्यक्रम व खेल मंत्रालयाद्वारे तेनसिंग नॉर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार २०२० वितरित करण्यात येणार आहे. त्याकरिता केंद्र शासनाकडे नामांकन सादर करण्याकरिता प्रत्येक जिल्ह्यातून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. या पुरस्काराकरिता खेळाडूंनी १ जुलैपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित यांनी केले आहे.
पेरणीची घाई करू नये
जळगाव : अपुऱ्या ओलाव्यावर पेरणी केल्यानंतर पावसाचा खंड झाल्यास पेरणी वाया जाऊ शकते व दुबार पेरणीचे संकट येऊ शकते, त्यामुळे शेतकऱ्यांनी पुढील आठवड्यातील हवामानाचा अंदाज पाहून व जमिनीतील उपलब्ध ओलावा पाहूनच पेरणीबाबत निर्णय घ्यावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. यामध्ये घाई करू नये, असेही कळविण्यातच आले आहे.
शिष्यवृत्तीकरिता महाडीबीटी पोर्टलवर अर्ज
जळगाव : शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत विद्यार्थ्यानी तसेच महाविद्यालयांनी महाडीबीटी संकेतस्थळावर दिलेल्या मार्गदर्शक सूचना व नियमांचे पालन करून अर्ज करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. त्रुटीच्या पूर्ततेसाठी परत पाठविलेले अर्ज विद्यार्थ्यांनी व महाविद्यालयांनी सुधारणा करून पुन्हा पाठविणे आवश्यक आहे. पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विद्यार्थी तसेच महाविद्यालयाची राहणार असल्याचेही एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने कळविले आहे.
आरोग्य क्षेत्रात कौशल्य विकास प्रशिक्षणाची संधी
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य व वैद्यकीय क्षेत्रामध्ये साथीच्या रोगाशी संबंधित उद्भवलेल्या परिस्थितीत कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, या क्षेत्रातील संसाधनांमधील आवश्यक मनुष्यबळाचा तुटवडा दूर व्हावा, याकरिता आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छुक असलेल्या युवक, युवतींना हेल्थकेअर, मेडिकल, नर्सिंग व डोमेस्टिक वर्कर क्षेत्रांमध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण प्रदान करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. इच्छुकांनी संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे साहाय्यक आयुक्त डॉ. राजपाल कोल्हे यांनी केले आहे.