खिचडी- दी शापोआ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 01:38 AM2017-09-11T01:38:54+5:302017-09-11T01:39:12+5:30
‘लोकमत’च्या वीकेण्ड स्पेशलमधील अॅड.सुशील अत्रे यांचा लेख
आजकाल सिनेमांची नावं कशी असतात ते बघताय ना? इंद्रा दी टायगर, बाजीराव- दी फायटर वगैरे वगैरे, सगळे एकापेक्षा एक हिट ! यावरुनच स्फूर्ती घेऊन शासनाने आपला माहितीपट बनविण्याचे ठरविले. डाकुमेंट्री हो, अन् काय? ‘खिचडी’ या अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयावर हा माहितीपट काढायचा, असं ठरलं. मग शासकीय कुळधर्मानुसार माहितीपटासाठी टेंडर मागविले. रासिक पार्क’चे तीनही भाग काढता येतील. इतक्या रकमेचं टेंडर मंजूर झालं आणि माहितीपट आकाराला आला. खरं तर हा संपूर्ण प्रकल्प अत्यंत गोपनीय ठेवण्यात आला होता. पण आमचे शासनात वर्पयत लागेबांधे असल्यामुळे या माहितीपटासाठी ट्रेलर- म्हणजे आज कालच्या भाषेत ‘टीझर’ आम्हाला बघायला मिळाला. आमचे वाचकांवर मुळातच फार प्रेम असल्याने त्याचाच नमुना इथे पेश करतोय. प्रसंग पहिला : (स्थळ- शाळेचे आवार, वेळ- कोणत्याही शाळेवर येवू शकते अशी. शाळेतील शालेय पोषण आहार योजनेची काटेकोर तपासणी सुरू आहे. तपासणी अधिकारी ‘सूक्ष्म’ निरीक्षण करून प्रश्न विचारताहेत. मुख्याध्यापक तथा हेडमास्तर चाचरत उत्तरे देत आहेत. इतर शिक्षकगण बाजुला नम्रपणे उभा आहे. त.अ. : हूंùù ! ही चौदा पोती दिसताहेत काय ? हे.मा.: हो साहेब. त.अ.: पण रजिस्टरनुसार शिल्लक पाहिजे चौदा पोती आणि सातशे ग्रॅम. मग ते वरचे सातशे गॅम तांदूळ कुठे आहेत? हे.मा. : साहेब, आजच्या खिचडीसाठी वापरले गेले .. असतील. त.अ. : असतील ? असतील म्हणजे काय? निश्चित सांगा अंदाज नको. हे.मा. : बरं साहेब, सॉरी साहेब. त.अ. : आणि संपूर्ण आठवडय़ाचा मेनू लिहिलेला दिसत नाही? कां लिहिला नाही? हे.मा. : तो काय साहेब.. त.अ. : कुठे? तो ? नियम काय आहे? ठळक जागी लिहावा. ही ठळक जागा आहे? हे.मा. : सॉरी साहेब, चुकलो साहेब. त.अ. : इतका तांदूळ शिल्लक कसा राहिला ? हे.मा. : (काकुळतीने) साहेब,इथे शहरातली मुलं इतकं खात नाहीत. वाया जातं अन्न. त.अ. :नियम काय आहे? प्रत्येक विद्याथ्र्यामागे एकशे पंधरा ग्रॅम तांदूळ ! मग? हे.मा. : पण साहेब, मुलं घेतच नाहीत खिचडी, घरुन सॅडविच आणतात डब्यात. त.अ.: ते तुमचं तुम्ही बघा. शासन धोरणानुसार प्रत्येकी एकशे पंधरा ग्रॅमची खिचडी झालीच पाहिजे आणि ती संपलीच पाहिजे. फेकली तर कारवाई होईल. हे.मा. : (रडवेल्या सुरात) मग काय मी खाऊ का दहा, बारा किलो खिचडी? त.अ.: यासंदर्भात शासनाचे नियम स्वयंस्पष्ट आहेत. त्यांचे यथाशक्ती पालन झाले पाहिजे. तुम्ही खाल्ली तर तो शासकीय मालमत्तेचा अपहार ठरेल. कारवाई होईल. हे.मा. : साहेब, काय केलं तर कारवाई होणार नाही? त.अ. : यासंदर्भात काही शासन निर्णय झाल्यास तुम्हास अवगत केले जाईल. सगळे : हो साहेब, सॉरी साहेब, चुकलं साहेब.. प्रसंग दुसरा : (या घटनेनंतर शालेय स्तरावर अथक परिश्रम करुन हे.मा. आणि इतर शिक्षकांनी शासनाचे धोरण काटेकोरपणे राबवले आणि परिणाम दिसू लागला. सहावीच्या चिमुकल्या आपसात चिवचिव करताना दिसतात) ‘बै..आमच्या इतिहासच्या मॅडम आहेत ना बै, बरोब्बर चौसष्ट ग्रॅमची खिचडी करुन दाखवता.. डाळ पकडून बहात्तर ग्रॅम!’ ‘आमच्या मराठीच्या मॅडमबाईंनी तर खिचडीवर निबंध लिहायला सांगितलाय-’ ‘हिंदीच्या सरांनी कविता केली खिचडीवर.. आमच्या ‘क’ तुकडीने बसवलीय’ अशाप्रकारे संपूर्ण शाळा जणू खिचडीमय होऊन गेलेली दिसते. चहूकडे एकच नाव ऐकू येते. खिचडी! हळूहळू विद्यार्थीनींवरुन कॅमेरावर सरकतो. सगळी शाळा कॅमेरात दिसू लागते. पाठीमागे मुलांच्या आवाजात प्रार्थना ऐकू येते.. ‘प्रभु रे आम्हां, देई खिचडी सदा.. या ‘टीझर’वरुनच लक्षात येईल, की माहितीपट किती प्रभावी झालाय ! आता तो प्रदर्शित कधी होणार, याबाबत शासन निर्णय झाला की परिपत्रकान्वये तो संबंधिताना अवगत करण्यात येईल ! नाव विसरू नका- ‘खिचडी दि शापोआ !’ (कठीण शब्दांचे अर्थ : शापोआ = शालेय पोषण आहार)