जळगाव येथे अपघातात बेशुध्द तरुणाच्या मदतीसाठी धावली ‘खाकी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 12:52 PM2018-08-28T12:52:16+5:302018-08-28T12:53:49+5:30
मातेने मानले पोलिसाचे आभार
जळगाव : गोविंदा रिक्षा थांब्याजवळ अपघातात गंभीर जखमी झालेल्या रिक्षा चालकाला शहर पोलीस स्टेशनचे हेडकॉन्स्टेबल विजयसिंग पाटील यांनी जीवदान दिल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा तशीच घटना रक्षाबंधनाच्या दिवशी रात्री साडे दहा वाजता अयोध्या नगरात घडली. अजय शैलेंद्र साठे असे जखमी तरुणाचे नाव असून स्थानिक गुन्हे शाखेचे हेडकॉन्स्टेबल शरद भालेराव त्याच्या मदतीसाठी धावून गेले.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, रक्षाबंधनाच्या दिवशी रात्री साडे दहा वाजता अयोध्या नगरात एक तरुण रक्तंबबाळ व बेशुध्दावस्थेत रस्त्यावर पडलेला होता तर त्याच्याबाजूला दुचाकी पडलेली होती. या तरुणाच्या खिशातील मोबाईलची रिंग सतत वाजत होती, मात्र तरीही तो तरुण प्रतिसाद देत नव्हता. रात्री जेवण झाल्यानंतर गल्लीत फिरणाऱ्या महिलांनी हे दृष्य पाहिले. बराच वेळ झाला तरी मोबाईलची रिंगही वाजते आहे व तरुणही बेशुध्द अवस्थेत असल्याने या महिलांनी याच परिसरात राहणारे स्थानिक गुन्हे शाखेचे हेडकॉन्स्टेबल शरद भालेराव यांचे घर गाठले. तरुण बेशुध्द असल्याने त्यांनी त्याच्या तोंडावर पाणी मारले, मात्र तरीही प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे त्यांनी एका तरुणाची मदत घेत स्वत:च्या दुचाकीवरुन अयोध्या नगरातील खासगी डॉक्टरकडे नेले. झोपलेल्या डॉक्टरांना विनंती करुन त्यांनी या तरुणावर उपचार करायला लावले. तेथे हा तरुण शुध्दीवर आला. कोणत्या वाहनाने धडक दिली हे त्यालाही सांगता येत नव्हते.मात्र डोक्याला जबर मार लागला होता. तेथे त्याची चौकशी केली असता त्याने अजय साठे असे नाव सांगितले.
अन् आईचे काळीज धडधडले
शरद भालेराव यांनी अजय याला त्याच्या घरी नेले असता आई चिंतेतच होती. तर दुसरीकडे तीन बहिणी सतत आईशी भावाच्याबाबतीत विचारणा करीत होत्या. जखमी मुलाला पाहून आईने एकच हंबरडा फोडला. अजय बेटा हे काय झाले..असे म्हणत ते रडत होत्या. तुझ्या वडीलांचा तीन महिन्यापूर्वीच मृत्यू झाला अन् आज तुझी ही अवस्था... असे म्हणत त्यांचे काळीजही धडधड करीत होते. भालेराव यांनी त्यांना धीर देत तुमचा मुलगा सुखरुप आहे. अपघातात जखमी झाला होता व त्याच्यावर उपचारही झाले असल्याचे सांगितल्याने त्यांचा जीवात जीव आला.
तीन बहिणींचा एकुलता भाऊ
बहिणी बाहेरगावी लांब असल्याने रक्षाबंधनाला येऊ शकल्या नाहीत, म्हणून त्या सायंकाळपासून भाऊ व आईशी बोलण्याचा प्रयत्न करीत होत्या.परंतु भावाच्या मोबाईलवर रिंंग जाऊनही प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांचीही चिंंता वाढली होती. साठे कुटुंब अहमदनगर जिल्ह्यातील आहे. अजय याचे एमबीए झाले असून तो खासगी कंपनीत नोकरी करतो. वडीलांचे तीन महिन्यापूर्वीच निधन झाल्याने कुटुंबाची मदार अजयवरच आहे.