श्वानासाठी खुर्चीला लाथ मारली; अनिल चौधरी-माळी एकमेकांत भिडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:32 AM2020-12-16T04:32:10+5:302020-12-16T04:32:10+5:30

जळगाव : ढाब्यावर जेवणाला बसलेले असताना खुर्चीला लाथ मारून ती खुर्ची श्वानाला लागल्याच्या कारणावरून भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी ...

Kicked the chair for the dog; Anil Chaudhary and Mali clashed | श्वानासाठी खुर्चीला लाथ मारली; अनिल चौधरी-माळी एकमेकांत भिडले

श्वानासाठी खुर्चीला लाथ मारली; अनिल चौधरी-माळी एकमेकांत भिडले

Next

जळगाव : ढाब्यावर जेवणाला बसलेले असताना खुर्चीला लाथ मारून ती खुर्ची श्वानाला लागल्याच्या कारणावरून भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी व जळगाव मनपाचे माजी नगरसेवक सुनील माळी यांचे भाऊ मुकेश दत्तात्रय माळी एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यासह पिस्तूल काढल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ही घटना रविवारी रात्री पावणेअकरा वाजता महामार्गावर खेडीशिवारातील हॉटेल न्यू पंजाब ढाब्यावर घडली. याप्रकरणी मंगळवारी (दि.१५) एमआयडीसी पोलीस ठाण्यात अनिल चौधरी, मुकेश माळी, भगत बालाणी यांच्यासह नऊ जणांविरुद्ध दंगल व शस्त्राचा गैरवापर केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल छबीलदास चौधरी, केदारनाथ वामन सानप, दुर्गेश ठाकूर, चौधरी यांचा चालक गोलू (सर्व रा.भुसावळ) व जळगाव मनपाचे नगरसेवक भगत रावलमल बालाणी हे रविवारी खेडी शिवारातील हॉटेल न्यू पंजाब ढाब्यावर जेवणाला गेले होते. त्याचवेळी जळगाव मनपाचे माजी नगरसेवक सुनील माळी यांचे भाऊ मुकेश दत्तात्रय माळी, छोटू पाटील व इतर तीन जणदेखील येथे जेवणाला बसले होते. यावेळी जेवण झाल्यानंतर अनिल चौधरी यांनी खुर्चीला लाथ मारली व ती खुर्ची श्वानाला मारली. त्या कारणावरून अनिल चौधरी व मुकेश माळी यांच्यात वाद होऊन हमरीतुमरी झाली. त्यात दोन्हीकडील कार्यकर्ते एकमेकांवर धावून आले. यावेळी केदारनाथ सानप याने कमरेतील पिस्तूल काढून दम भरल्याने वातावरण जास्तच तापले.

व्हिडिओ व्हायरल झाल्याने फुटली वाचा

रविवारी घडलेल्या या घटनेचा मंगळवारी व्हिडिओ व्हायरल झाला. त्याची दखल घेऊन एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक प्रताप शिकारे यांनी ख‌ात्री करण्यासाठी उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील, सहायक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, जितेंद्र राजपूत, किशोर पाटील, सचिन पाटील व मुकेश पाटील यांचे पथक पाठविले. या पथकाने घटनास्थळ, ढाबामालक तुषार फकिरा बाविस्कर यांची चौकशी केली. ढाब्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात चौधरी व माळी गट एकमेकांवर चालून येत असून, हाणामारी करताना दिसून येत आहेत. खुर्च्यांचीही तोडफोड झाली आहे. आवराआवर झाल्यानंतरही दोन्ही गट एकमेकांवर धावून येतात व परतीच्या वेळी एका जणाजवळ पिस्तूल दिसून येत आहे. घटना घडल्याची खात्री व पुरावे मिळाल्यावर पोलीस कर्मचारी मुकेश पाटील यांनीच सरकारतर्फे फिर्याद दिली. त्यात दंगल व शस्त्राचा वापर केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भगत बालाणींचा वाढदिवस

नगरसेवक भगत बालाणी यांचा रविवारी वाढदिवस होता. त्यासाठी अनिल चौधरी यांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी जेवणास बोलाविले होते. जेवण झाल्यानंतर हा वाद झाला. या घटनेचा व्हिडिओ मंगळवारी व्हायरल झाला. हा व्हिडिओ व सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनीदेखील पोलीस ठाण्यात येऊन घटनेची माहिती घेतली.

Web Title: Kicked the chair for the dog; Anil Chaudhary and Mali clashed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.