तीन जणांचे अपहरण करत व्यापाऱ्याकडे मागितली आठ लाखांची खंडणी

By विजय.सैतवाल | Published: June 4, 2024 12:06 AM2024-06-04T00:06:06+5:302024-06-04T00:06:29+5:30

खळबळजनक : तिघांच्या शोधार्थ पोलिस पथक रवाना

Kidnapped three people and demanded a ransom of eight lakhs from the merchant | तीन जणांचे अपहरण करत व्यापाऱ्याकडे मागितली आठ लाखांची खंडणी

तीन जणांचे अपहरण करत व्यापाऱ्याकडे मागितली आठ लाखांची खंडणी

जळगाव : ऑनलाइन गेमिंग खेळण्यासाठी गेलेल्या तीन जणांचे अज्ञात सहा जणांनी कुसुंबा येथील साई सिटी येथून अपहरण करून परराज्यात नेले. त्यांच्या सुटकेसाठी सागर कमल लुल्ला (२४, रा. नवजीवन सोसायटी, भुसावळ) या व्यापाऱ्याकडे आठ लाख रुपयांची खंडणी मागितली असून यापैकी एक लाख ९० हजार रुपये व्यापाऱ्याने पाठविले आहे. अपह्रतांच्या शोधार्थ एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पथक छत्तीसगडकडे रवाना झाले आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.


व्यापारी सागर लुल्ला यांचा शेअर मार्केटिंगचा व्यवसाय असून जळगाव येथील सिंधी कॉलनी येथे त्यांचे दुकान आहे. ते दररोज भुसावळ येथून अपडाऊन करतात. त्यांच्या पत्नीचा आतेभाऊ रोहित कैलास दर्डा (रा. टीव्ही टॉवर, भुसावळ), मित्र विशाल अनिल शुबवाणी (रा. सिंधी कॉलनी, भुसावळ) हे काही दिवसांपासून अजय ठाकरे (रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) यांच्यासोबत कुसुंबा   येथे ऑनलाइन गेमिंग खेळत आहे.  रविवार, २ जून रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास लुल्ला यांना त्यांच्या मोबाईलवर मित्र विशाल शुबवाणी यांच्या फोनवरून कॉल आला व त्यांनी सांगितले की, आम्ही फसलो आहे. आम्हाला घेण्यासाठी रात्री १ वाजता सहा इसम आले. त्यांना जर २५ लाख रुपये नाही दिले तर ते आम्हाला लखनऊ घेऊन जातील. तुम्ही २५ लाख रुपये द्या. त्यावेळी फिर्यादीने, त्यांच्याकडे एवढे पैसे नसल्याचे सांगत लगेच फोन कट केला.  मात्र पुन्हा त्यांच्या मोबाईलवर सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास दुसरा फोन आला. पलीकडून अज्ञात इसमाने सांगितले की, ‘तुमको अगर तुम्हारे आदमी चाहिये तो जल्दी से जल्दी पैसे दो, ’ असे म्हणून त्याने फोन विशाल शुबवाणी यांच्याकडे दिला. त्यांनी सांगितले की, आमचे या इसमांसह बोलणे झाले असून आठ लाख रुपयांमध्ये ठरले आहे. तू मला ८ लाख रुपये पाठवून दे. फिर्यादीने मात्र त्यांच्याकडे अडीच लाख रुपये असल्याचे सांगितले.

तिघांचा ओरडण्याचा आवाज
सकाळी १० वाजता लुल्ला हे त्यांच्या दुकानावर गेले असता दुकानावर त्यांच्या ओळखीचे इसम आले व त्यांनी सांगितले की, त्यांच्या कंपनीत काम करणारा पवन याला मोबाईलवर अजय ठाकरे यांचा कॉल आला होता व कोणीतरी दुसऱ्या इसमाने सांगितले की, यांना लवकर पैसे द्या. नाहीतर आम्ही रोहित दर्डा, विशाल शुबवाणी, अजय ठाकरे यांना मारून टाकू. त्यावेळी फोनच्या बाजूला अजय, रोहित आणि विशाल यांचे मोठमोठ्याने ओरडण्याचे आवाज येत होते. नंतर परत संध्याकाळी पवन याला फोन आला धमकावत अज्ञात व्यक्तीने अजय ठाकरे यांचा बँक खाते क्रमांक पाठविला व लुल्ला यांनी त्यावर एक लाख २० हजार रुपये पाठविले. दुसरीकडे पैसे मागणीबाबत रोहित दर्डा यांची बहीण पूजा दर्डा यांनीदेखील सांगितले की, रोहितला कोणीतरी किडनॅप केले आहे. त्याला सोडवण्यासाठी समोरच्या व्यक्तींनी पैशाची मागणी केल्याने ७० हजार रुपये पाठवले आहे.


या प्रकरणी सागर लुल्ला यांनी एमआयडीसी पोलिस फिर्याद दिली. त्यानुसार एमआयडीसी पोलिसांचे पथके छत्तीसगडच्या दिशेने रवाना झाली आहेत.

Web Title: Kidnapped three people and demanded a ransom of eight lakhs from the merchant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव