साकेगावमधील चिमुकल्याच्या अपहरण प्रकरणाचा पर्दाफाश, पाच जणांना अटक, एका पोलिसाचाही समावेश 

By विजय.सैतवाल | Published: April 30, 2024 12:23 AM2024-04-30T00:23:18+5:302024-04-30T00:23:41+5:30

पोलिसांच्या पाठलागाची कुणकुण लागताच आठ महिन्यांचा चिमुकला ठेवला अनाथाश्रमात

Kidnapping case in Sakegaon busted, five arrested, including a policeman | साकेगावमधील चिमुकल्याच्या अपहरण प्रकरणाचा पर्दाफाश, पाच जणांना अटक, एका पोलिसाचाही समावेश 

साकेगावमधील चिमुकल्याच्या अपहरण प्रकरणाचा पर्दाफाश, पाच जणांना अटक, एका पोलिसाचाही समावेश 

 जळगाव : भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथून झोक्यातून पळवून नेलेल्या आठ महिन्यांच्या चिमुकल्याचा पोलिसांनी शोध लावला असून या बालकाला भुसावळातील अलका जीवन स्पर्श फाउंडेशन ट्रस्ट या अनाथाश्रमातून ताब्यात घेत पालकांच्या स्वाधीन केले. दोन अल्पवयीन मुले व एका पोलिस कर्मचाऱ्याच्या मदतीने बालकाला मुबंई येथे विकण्यात आल्याची बाब समोर आली आहे. मात्र पोलिस मागावर असल्याची कुणकुण लागताच या बालकाला अनाथाश्रमात आणून ठेवण्यात आल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या प्रकरणात पाच जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सोमवार, २९ एप्रिल रोजी पत्रकार परिषदेत दिली.  

साकेगाव येथून एका घरातून मंगळवार, २३ एप्रिल रोजी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास झोक्यात झोपलेल्या आठ महिन्यांच्या बाळ‌ाचे अपहरण करण्यात आले होते. या याप्रकरणी भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखा व भुसावळ तालुका पोलिस तपास करत असताना या दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे भुसावळ शहरातील नारायण नगरातील अलका जीवन स्पर्श फाउंडेशन या ट्रस्टवर पोलिसांनी छापा टाकला असता तेथे अपहरण झालेले आठ महिन्याचे बालक सापडले. त्याला ताब्यात घेत ते पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

दोन अल्पवयीन मुलांचा समावेश
या गुन्ह्यात पोलिसांनी दीपक रमेश परदेशी (३२, रा. नारायण नगर, भुसावळ), अमीत नारायण परिहार (३०, रा. नागसेन कॉलनी, कंडारी, ता. भुसावळ), कुणाल बाळू वाघ (१९, रा. साकेगाव, ता. भुसावळ), बाळू पांडूरंग इंगळे (५१, रा. वरणगाव, ता. भुसावळ), रिना राजेंद्र कदम (४८, रा. नारायण नगर, भुसावळ) या पाच जणांना अटक करण्यात आले आहे. या शिवाय  अजून एका जणाचा शोध सुरू असून दोन अल्पवयीन मुलांचाही यात समावेश असल्याचे समोर आले आहे. या अल्पवयीन मुलांच्या मदतीनेच बालकाला झोक्यातून काढण्यात आले होते.

पोलिसाचाही समावेश
अटकेतील बाळू इंगळे हा नंदुरबार जिल्हा पोलिस दलात बिनतारी संदेश विभागात पोलिस हवालदार म्हणून कार्यरत आहे. तसेच अटक केलेल्या अन्य जणांवर खून, खंडणी, घरफोडी, जबरी चोरी, मारामारी, आर्म ॲक्ट व इतर प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

तीन लाख ८० हजारात झाला व्यवहार
या चिमुकल्याचे अपहरण प्रकरणात मुख्य सूत्रधार रिना कदम ही महिला आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई येथील एका महिलेला मुल दत्तक घ्यायचे असल्याने त्याविषयी तिने रिना हिना सांगितले होते. त्यासाठी रिनाने दोन अल्पवयीन मुले व इतरांच्या मदतीने साकेगावातून आठ महिन्यांचे बाळ पळविले. त्यानंतर नंदुरबार पोलिस दलातील बाळू इंगळे याच्या मदतीने त्याला मुंबई येथे संबंधित महिलेला देण्यासाठी नेण्यात आले. यात तीन लाख ८० हजार रुपयांचा व्यवहार झाला होता. मात्र पोलिस पाठलाग करत असल्याची कुणकुण लागताच अपहरणकर्त्यांनी बालकाला अनाथाश्रमात आणून ठेवले. मात्र सीसीटीव्ही फुटेज व अन्य तांत्रिक मुद्द्यांवरून ते पोलिसांच्या जाळ्यात अडकले.

दरम्यान, सदर अनाथाश्रमाची धर्मादाय आयुक्तांकडे २०२२मध्ये नोंदणी झालेली आहे. मात्र हा अनुभव पाहता या विषयी धर्मादाय आयुक्तांना या प्रकरणाविषयी महिती देण्यात येणार असल्याचे पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सांगितले.

यांनी केली कारवाई
पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णकांत पिंगळे, वरिष्ट पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील, पोलिस निरीक्षक बबन जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विशाल पाटील, सहाय्यक फौजदार विठ्ठल फुसे, पोहेकॉ युनूस शेख, प्रेमचंद सपकाळे, वाल्मिक सोनवणे, दिलीप जाधव, संजय भोई, संजय तायडे, पोलिस नाईक नितीन चौधरी, जगदीश भोई, राहुल महाजन, सहाय्यक फौजदार सादीक शेख, पोहेकॉ उमाकांत पाटील, रमन सुरळकर, योगेश माळी, प्रशांत परदेशी, योगेश माळी, अमर आढाळे, राहुल भोई, पोलिस उपनिरीक्षक गणेश वाघमारे यांनी कारवाई केली आहे.
 

Web Title: Kidnapping case in Sakegaon busted, five arrested, including a policeman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.