सहा लाखांच्या खंडणीसाठी अमळनेर येथे डॉक्टरचे अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 03:05 PM2019-08-18T15:05:27+5:302019-08-18T15:49:37+5:30
दोनजण ताब्यात, दोघे फरार
-
अमळनेर : सहा लाख रुपये खंडणीसाठी शहाद्याच्या दातांच्या डॉक्टरचे अपहरण करून डांबून ठेवून पिस्तूल लावून चौघांनी धमकावले. ही घटना शनिवारी घडली. अमळनेरच्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. तर यातील २ आरोपी फरार झाले आहेत.
शहादा येथील विजय नगरचे रहिवासी दंतवैद्यक विजय रघुवीर गोसावी गावोगावी फिरून आयुर्वेदीक दंतमंजन विक्री, दात सफाई, कवळी बसविण्याचे काम करतात. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अरविंद रवींद्र बि-हाडे (वय २०) आणि महेंद्र सीताराम मोरे (४०) यांना विद्याविहार कॉलनीतून १७ रोजी रात्री १० वाजता ताब्यात घेतले. पिस्तूल लावणारे २ मुख्य आरोपी फरार झाले आहेत. चारही आरोपींविरुद्ध अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश सदगीर करीत आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे, शहादा येथील दंतजवैद्यक गोसावी गावोगावी फिरून व्यवसाय करून उदरनिर्वाह भागवितात. गेल्या आठ दिवसांपासून अंजली पटेल नावाची महिला मोबाईलवरून त्यांना फोन करून तिच्या वडिलांचे दात बसविण्यासाठी येथील प्रताप कॉलॉनीमधील तिच्या घरी बोलवत होती.
वडिलांचे दोन त तिन नविन दात बसविणे आहे तरी तुम्ही अमळनेर येथे येवुन जा बाबत सागंत होती. सदरह महिलेने १६ आॅगस्ट रोजी मोबाईलवर फोन केला असता गोसावी यांनी तिला अमळनेर येथे येण्यासाठी होकार दिला. १७ रोजी गोसावी हे त्यांच्या कार (क्रमांक एम.एच.१९-सीयू-७१५५)ने त्यांच्या मावशीचा मुलगा तुषार जलाल गीर गोसावी याच्यासह अमळनेर शहरातील अॅक्सिस बँकेजवळ सकाळी १० वाजता पोहचले. त्यांनी अंजली पटेल नामक महिलेस तिच्या मोबाईलवर फोन करुन येथे पोहचल्याचे सांगितले. त्या महिलेने तिचा भाऊ विनोद यास घेण्याकरीता पाठवित असल्याचे फोनवर सांगितले. गोसावी त्यांच्या भावासह अॅक्सीस बँकेजवळ थांबले. त्यावेळी त्यांच्आ जवळ दोनजण आले व त्यांनी अंजली हिने पाठविल्याचे सांगितले. त्यानंतर गोसावी यांनी त्या दोघांना कारमध्ये बसविले. दोघांनी गोसावी यांना शहरातील विध्याविहार कॉलनी मधील एका घरी नेले. त्यानंतर अचानक घराचा दरवाजा बंद केला. तिथे आणखी दोनजण आले. त्या चौघांनी पोलीस असल्याचे सांगून गोसावी व त्यांचा भाऊ तुषार यास मारहाण केली. मारहाणीचे कारण विचारले असता, तू एका व्यक्तीचे दात बसविल्यामुळे तो इसम दगावलाआहे. त्यामुळे तुला मारहाण करण्यास आमच्या साहेबांनी सांगीतले आहे, असे चौघांनी सांगितले. येथून सुटका करायची असेल तर साहेबांना सहा लाख रुपये दे आणि आम्हा चार जणांना वेगळे पैसे दे. नाहीतर तुला व तुझ्या भावाला मारुन टाकू, अशी धमकी कपाळावर पिस्तूल ठेवत त्यांनी दिली.
तेव्हा घाबरून गोसावी यांनी येथील बहिणीकडून पैसे घेऊन देण्याचेच कबूलही केले. गोसावी यांचे मेहुणे दिनेश कोठारी यांनी पैसे घेऊन येतो, असे मोबाईलवरून सांगितले. त्यावेळी त्या चौघांपैकी एकाने त्यांचा फोन हिसकावून घेतला. त्यांना घरातच डांबून ठेवले. दोघांचे मोबाईल, दोन एटीएम कार्ड व गोसावी यांच्याकडील ३ हजार तर तुषार यांच्यातडील ५ हजार जबरीने हिसकावून घेतले. त्यानंतर एकाने तुषार यांना एका स्कुटीवर बसवून नेले. त्यायनंतर गोसावी हे कसेबसे इतरांच्या तावडीतून सुटून पळून गेले. शहरात लपून त्यांनी मेहुणे कोठारी यांना फोन करून घडलेला प्रकार सांगितला. शनिवारी दुपारी एक वाजता गोसावी यांनी मेहुणे व नातेवाइकांसह येथील पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. तेव्हा गोसावी यांचा मावस भाऊ तुषार हा देखील पोलीस स्टेशनला येऊन पोहचला.