पत्नीचे किडनीदान, पतीचे वाचले प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 09:21 PM2019-08-06T21:21:14+5:302019-08-06T21:21:24+5:30
पारोळा : तालुक्यातील आडगाव येथील गरीब शेतकरी कुटुंबातील कर्त्या मुलाची किडनी निकामी झाली. या परिस्थितीत पत्नीने स्वत:ची किडनी देऊन ...
पारोळा : तालुक्यातील आडगाव येथील गरीब शेतकरी कुटुंबातील कर्त्या मुलाची किडनी निकामी झाली. या परिस्थितीत पत्नीने स्वत:ची किडनी देऊन आपल्या पतीचे प्राण वाचविले. किडनीदान करून पत्नीने तिच्या सौभाग्याचे लेणे जिवंत ठेवले आहे.
शेतकरी भाईदास बापू पाटील यांचा मुलगा दीपक याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. दोन एकर शेती विकून त्यांनी दीपकचे दोन वर्षांपर्यंत डायलिसिस केले. पण वैद्यकीय सल्ल्यानुसार दीपकच्या किडन्या बदलणे अपरिहार्र्य होते. यामुळे संपूर्ण कुटुंब तणावाखाली आले. आधीच प्रतिकूल परिस्थिती. त्यात किडनी विकत घेऊन प्रत्यारोपण करण्यासाठी पैसा कुठून आणायचा, अशी चिंता त्यांना सतावत होती.
या कठिण प्रसंगात दीपकला साथ दिली ती त्याची पत्नी मोहिनीने. मुंबई येथील एका हॉस्पिटलमध्ये दीपकला उपचारासाठी दाखल केल्यानंतर पत्नी मोहिनीने दीपकला आपली एक किडनी दान करण्याची इच्छा दर्शविली. त्यावेळी योगायोगाने पत्नीची किडनी दीपकला जुळवून आली. तिथेच शस्त्रक्रिया करून प्रत्यारोपण करण्यात आले. ही शस्त्रक्रिया यशस्वीही झाली.
कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न असताना आलेल्या संकटाला तोंड देताना मात्र भाईदास पाटील यांना उपचारासाठी शेती विकावी लागली. या परिस्थितीत डॉ.हर्षल माने यांनी कुटुंबातील सदस्यांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. तसेच आमदार डॉ.सतीश पाटील मदत मिळवून देणार आहेत.