मुलांना शाळेत ॲडमिशन हवीय, मग तुमचा भाडेकरारही चालेल! आरटीईमध्ये निवासी पुराव्यासाठी तरतूद
By अमित महाबळ | Published: March 1, 2023 06:17 PM2023-03-01T18:17:44+5:302023-03-01T18:19:22+5:30
जन्मतारखेचा पुरावा म्हणून वडील किंवा पालकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केलेले स्वयंनिवेदन देखील ग्राह्य धरले जाणार आहे.
जळगाव : आरटीई अंतर्गत २५ टक्के प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया बुधवारपासून सुरू झाली. यामध्ये पालक निवासी पुराव्यासाठी शाळेच्या कार्यक्षेत्रातील भाडे करार सादर करू शकतील, पण तो दुय्यम निबंधक यांच्याकडे नोंदणी केलेला लागेल. जन्मतारखेचा पुरावा म्हणून वडील किंवा पालकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केलेले स्वयंनिवेदन देखील ग्राह्य धरले जाणार आहे.
जळगाव जिल्ह्यात आरटीई अंतर्गत २८२ शाळांनी नोंदणी केलेली असून, ३ हजार १२२ शाळा उपलब्ध झालेल्या आहेत. विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. याची अंतिम मुदत १७ मार्च, रात्री १२ वाजेपर्यंत आहे. तालुकास्तरावरील पडताळणी समितीमार्फत निवड झालेल्या मुलांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येऊन पात्र उमेदवारांचा प्रवेश अंतिम करण्यात येणार आहे. निवासी पुरावा, वंचित संवर्गाकरिता जात प्रमाणपत्र, दिव्यांग असल्यास प्रमाणपत्र, आर्थिक दुर्बल असल्यास उत्पन्नाचा दाखला, जन्माचा दाखला, घटस्फोटीत व विधवा महिला असल्यास आवश्यक कागदपत्रे, एकल पालकत्व असल्यास आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत.
ही कागदपत्रे द्या -
निवासी पुरावा -
- रेशनिंग कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वीज देयक, टेलिफोन देयक, मालमत्ता कराचे देयक, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट व राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक यापैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरला जाणार आहे.
भाडेकराराबाबत हे लक्षात ठेवा -
- शाळेच्या कार्यक्षेत्रात स्वत:च्या मालकीची इमारत नसल्यास दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी केलेला भाडेकरार ग्राह्य धरला जाणार आहे. हा करार अर्ज भरण्याच्या दिनांकापूर्वीचा व त्याचा कालावधी ११ महिन्यांचा किंवा त्यापेक्षा जास्त लागणार आहे. पडताळणीत भाड्याच्या जागेत बालक, पालक राहत नाहीत असे आढळून आल्यास पालकांविरूद्ध कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. तसेच बालकाचा प्रवेशही रद्द होईल.
जन्मतारखेचा पुरावा -
ग्राम पंचायत, मनपा, नपा यांचा दाखला, रुग्णालयातील एएनएम रजिस्टरमधील दाखला, अंगणवाडी व बालवाडी रजिस्टरमधील दाखला, आई, वडील किंवा पालकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केलेले स्वयंनिवेदन.
आधार कार्ड संदर्भात ही तरतूद -
ही करणाने बालक व पालक यांना आधार कार्ड सादर करणे शक्य झाले नाही, तर बालकांचे आधार कार्ड सादर करण्याच्या अटीच्या अधीन राहून बालकांना तात्पुरता प्रवेश दिला जाणार आहे. त्यानंतर ९० दिवसांच्या आत बालकाचे आधार कार्ड शाळेकडे सादर करणे बंधनकारक राहील. मुदतीत पूर्तता न केल्यास तात्पुरता प्रवेश रद्द केला जाणार आहे.
कोविड प्रभावित बालके -
ज्यांच्या एक अथवा दोन्ही पालकांचे १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२२ कालावधीत कोविडमुळे निधन झाले आहे, अशी बालके या गटात येतात. पालकाचे मृत्यू प्रमाणपत्र, कोविडमुळे मृत्यू झाल्याचे रुग्णालयाचे वैद्यकीय प्रमाणपत्र, मृत्यू कोविड संबंधित असल्याचा प्रयोगशाळेचा अहवाल.
प्रवेशाच्या इतक्या संधी -
पालक दिलेल्या तारखेला हजर झाले नाहीत, तर त्यांना पुन्हा दोन संधी मिळणार आहेत. बालकांना प्रवेशासाठी पालकांनी पडताळणी समितीशी संपर्क साधावा. या समितीत गट शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक व इतरांचा समावेश आहे. जे विद्यार्थी कागदपत्रे तपासणीत अपात्र होतील त्यांची निवड रद्द केली जाणार आहे. त्यांना शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्याकडे दाद मागता येणार आहे. प्रवेशासाठी १० शाळांची निवड करायची आहे.