जळगावात दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलागुणांनी रसिक थक्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 12:04 PM2018-09-09T12:04:30+5:302018-09-09T12:07:15+5:30
‘दिव्य तेज’ कार्यक्रमास प्रतिसाद
जळगाव : शिर्डीवाले साईबाबा, चिठ्ठी ना कोई संदेश, आकाशी झेप घे रे पाखरा, माणसाने माणसाशी मानसासम वागणे अशा एकाहून एक सरस गीतांचे दिव्यांग विद्यार्थ्यांनी ‘दिव्य तेज’ या कार्यक्रमात केलेल्या सादरीकरणाने रसिकांची मने जिंकून दाद मिळविली.
सन्मान फाउंडेशन, रोटरी मीडटाऊन, दीपस्तंभ फाउंडेशन यांच्यातर्फे डॉ. स्वरुप लोढा यांच्या स्मरणार्थ शनिवारी संध्याकाळी कांताई सभागृहात ‘दिव्य तेज’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात दीपस्तंभ फाउंडेशनच्या मनोबल केंद्राच्या विद्यार्थ्यांनी गीते सादर केली. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, रोटरी डिस्ट्रीक्ट ३०३०चे डिस्ट्रीक्ट गव्हर्नर राजीव शर्मा, रोटरी क्लब आॅफ जळगाव मीडटाऊनचे अध्यक्ष किशोर सूर्यवंशी उपस्थित होते. प्रास्ताविक दीपस्तंभ फाउंडेशनचे संचालक यजुर्वेंद महाजन यांनी केले. त्यानंतर डॉ. सन्मान फाउंडेशनच्या संचालिका डॉ. सुमन लोढा, रोटरी मीडटाऊनचे माजी अध्यक्ष अनंत खांबेटे यांनी उपक्रमाविषयी माहिती देत मदतीचे आवाहन केले.
चित्रफितीने भारावले रसिक
मुख्य कार्यक्रमाच्या सुरुवातीला मनोबल केंद्राच्या दैनंदिन जीवनाची चित्रफित दाखविण्यात आली. यात ते कोणतेही काम कशाप्रकारे पूर्ण करतात व सर्व बाबतीत आघाडीवर राहत असल्याचे पाहून उपस्थित रसिक भारावून गेले. मनोबल केंद्राचा तेजस नाईक हा उत्कृष्ट गायक होता. त्याच्या निधनानंतर दिव्यांग विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या विचारात साकारण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच तेजसच्या गीतांची चित्रफित दाखविण्यात आली. त्याने सादर केलेल्या गीतांना उपस्थितांनी दाद दिली.
त्यानंतर गुरुप्रसाद सावंत व आशा वारंमळे यांनी सादर केलेल्या शिर्डी वाले साई बाबा... या जोशपूर्ण गीताने बहारदार सुरुवात झाली. त्यानंतर समीर खोब्रागडे, हिरादास बैरागी, विश्वास इलामे, हरिष चकोबे, जितेंद्र राठोड, लक्ष्मी शिंदे, दुर्गा गवई, दिव्यना अधिकारी, बाबी वानरे, वैष्णवी गोळे, कविता हडप यांनी समूह गीतांसह तु इस तराह से मेरी जिंदगी मे, कर चले हम फिदा, भातुकलीच्या खेळामधली अशी मराठी ंिहंदी गीते सादर करीत उपस्थितांची मने जिंकली.