जगावेगळी ही ममता...जगावेगळी अंगाई...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 12:11 PM2020-01-03T12:11:29+5:302020-01-03T12:11:46+5:30
आॅपरेशन मुस्कान :२२० बालके पालकांच्या कुशीत तर ४९ अनाथ बालनिरीक्षणगृहात
जळगाव : आॅपरेशन मुस्कान ७ या मोहीमेंतर्गत १ ते ३१ डिसेंबर या कालावधीत जिल्हाभर राबविण्यात आलेल्या मोहिमेत हरविलेल्या २२० बालकांना शोधून त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले तर ४९ बालके अनाथ असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर या बालकांना बालनिरीक्षणगृहात आसरा देण्यात आला आहे.
दरम्यान, गीतकार शांताराम नांदगावकर जगावेगळी ही ममता...जगावेगळी ही अंगाई...या गाण्यांच्या ओळींची आठवण या निमित्ताने झाली आहे.
सर्वोच्च न्यायालय, केंद्रीय गृहमंत्रालय व महिला बाल अत्याचार प्रतिबंधक विभाग, मुंबई यांच्या निर्देशानुसार देशभरात हरविलेल्या बालकांच्या शोधार्थ मोहीम राबविण्यात आली.
जिल्ह्यात पोलीस दल व केशव स्मृती प्रतिष्ठान अंतर्गत समतोल प्रकल्प या संस्थेच्या माध्यमातून मुलांचे आश्रमगृहे, अशासकीय संस्था, रेल्वे स्थानक, बसस्थानक, रस्त्यावर भीक मागणारे अथवा वस्तू विकणारे मुले, कचरा गोळा करणारी, धार्मिकस्थळे, रुग्णालय, हॉटेल, दुकाने, सिग्नल, मार्केट व अशा इतर ठिकाणी मोहीम राबवून २२० मुले व मुली मिळून आली.
या पथकाने राबविली मोहीम
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांच्या आदेशाने व स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बापू रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नीता कायटे, सहायक फौजदार शरीफ काझी, दादाभाऊ पाटील, वसंत लिंगायत, दत्तात्रय बडगुजर, छाया मराठे, वहीदा तडवी, उमेशगिरी गोसावी, परेश महाजन व समतोल प्रकल्पाच्या सदस्यांनी ही मोहीम राबविली.
पालकांना दिली कायदेशीर समज
ही मुले हरविलेली समजून त्यांचे फोटो घेण्यात आले. चौकशी करुन या बालकांच्या पालकांचा शोध घेण्यात आला. बालकांचे शिक्षणाचे महत्व आणि भीक मागण्यास लावू नये याबाबत कायदेशीर समज पालकांना देण्यात येवून बालकांना त्यांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, ४९ बालकांच्या पालकांचा शोध लागला नाही, त्यामुळे त्यांना अनाथ समजून बालनिरीक्षणगृहात दाखल करण्यात आले.