जळगाव - औरंगाबाद महामार्गावर चिखलाचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:20 AM2021-08-22T04:20:35+5:302021-08-22T04:20:35+5:30

जळगाव : जळगाव - औरंगाबाद महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू असून, रस्ता भरावासाठी टाकलेली माती पावसाने वर आली असल्यामुळे ...

The kingdom of mud on the Jalgaon-Aurangabad highway | जळगाव - औरंगाबाद महामार्गावर चिखलाचे साम्राज्य

जळगाव - औरंगाबाद महामार्गावर चिखलाचे साम्राज्य

Next

जळगाव : जळगाव - औरंगाबाद महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू असून, रस्ता भरावासाठी टाकलेली माती पावसाने वर आली असल्यामुळे येथे जागोजागी चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक संथ गतीने सुरू आहे. महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे व चिखलाने वाहन घसरून अपघाताचा धोका वाढला आहे. यामुळे महामार्गाच्या चौपदरीकरणाची कामे लवकरात लवकर पूर्ण करावी, अशी मागणी होत आहे.

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून शहर व परिसरात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे रस्त्यांवर प्रचंड चिखल झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर लोकमत प्रतिनिधीने जळगाव - औरंगाबाद रस्त्याची शनिवारी पाहणी केली. त्यात जळगाव-औरंगाबाद महामार्गाची गेल्या काही महिन्यांपूर्वी अत्यंत दुर्दशा झाली होती. नंतर या महामार्गाची दुरुस्ती करण्यात आली. परंतु, महामार्गावर होणाऱ्या ओव्हरलोड वाहतुकीमुळे आता पुन्हा जागोजागी खड्डे पडल्याचे पहायला मिळाले. अजिंठा चौफुली तसेच काशीनाथ चौकात भला मोठा खड्डा पडलेला पहायला मिळत आहेत. या खड्ड्यांमधून वाहनधारकांना चांगलीच कसरत करावी लागत होती. विशेष म्हणजे, त्यामध्ये पावसाचे पाणी साचल्यामुळे खड्ड्यांचा अंदाज न आल्यामुळे अपघात होत आहेत.

वाहनचालकांना डोकेदुखी

दरम्यान, जळगाव-औरंगाबाद महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असून, हे काम अर्धवट आहे. परिणामी, रस्ता भरावासाठी वापरलेली माती ही रस्त्यावर येत असल्याने वाहनचालकांना डोकेदुखी ठरत आहे. एवढेच नव्हे तर कृषी उत्पन्न बाजार समिती ते रेमंड चौफुलीपर्यंतचा रस्ता प्रचंड चिखलमय झालेला आहे. याठिकाणी अनेक दुचाकीस्वार चिखलमय रस्त्यामुळे पडण्याच्या घटनादेखील घडत आहेत, तर महामार्गावर काही ठिकाणी रस्त्याची एक बाजू बंद असल्याने अनेकवेळा वाहतूक कोंडीदेखील होत असल्याचे चित्र पहायला मिळाले.

रस्त्याच्या कडेला भरतो बाजार

काशीनाथ चौकातील रस्ता हा उंच व सखल झाला असून, प्रचंड चिखल झालेला आहे. दुसरीकडे रस्त्याच्या एका बाजूला बाजार भरत असल्यामुळे त्या बाजूने वाहतुकीची कोंडी होत असल्याचा प्रकार घडत आहे. काही वाहनचालकांकडून रस्त्यावरच वाहने लावली जात होती. त्यामुळे मोठ्या वाहनांना महामार्गावरून वाट काढताना अडचणी येत होत्या. दरम्यान, हे नित्याचेच झाले असल्याचे एका हॉटेलचालकाने सांगितले.

अपघाताच्या भीतीने दुचाकी नेली ढकलत

शनिवारी सायंकाळीसुद्धा पावसाने हजेरी लावली. त्यामुळे एमआयडीसी पोलीस ठाणे परिसरातील महामार्गाच्या दोन्ही बाजूला प्रचंड चिखल झाला होता. या रस्त्यावर अक्षरश: वाहने घसरत होती. अपघाताच्या भीतीने एक तरुण हा दुचाकी ढकलत घेऊन जात असल्याचे पहायला मिळाले. या रस्त्यावर प्रवास करताना खूप वेळ वाया जात आहे. त्यामुळे या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: The kingdom of mud on the Jalgaon-Aurangabad highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.