Kirit Somaiyya : 'अशी दादागिरी चुकीची, तुम्ही खरे आहात तर पुढे यायला हवं'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2022 02:26 PM2022-02-07T14:26:03+5:302022-02-07T14:28:24+5:30
रक्षा खडसेंनी किरीट सोमय्यांवरील हल्ल्याचा निषेध व्यक्त केला. तसेच, अशी दादागिरी चुकीची असून जर तुम्ही भ्रष्टाचार केला नसेल, तुम्ही खरे आहात तर पुढे येऊन सांगायचा प्रयत्न करा
जळगाव - भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर शनिवारी पुणे महानगरपालिकेत हल्ला करण्यात आला. शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्यानंतर भाजप नेत्यांनी या घटनेचे तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. त्यानंतर, किरीट सोमय्यांनी थेट मुख्यमंत्री कार्यालयावर गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आलेल्या सूचनेनंतर माझ्यावर हल्ला झाल्याचे ते म्हणाले. याबाबत भाजप नेत्या खासदार रक्षा खडसे यांनीही मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारला प्रश्न विचारले आहेत.
रक्षा खडसेंनी किरीट सोमय्यांवरील हल्ल्याचा निषेध व्यक्त केला. तसेच, अशी दादागिरी चुकीची असून जर तुम्ही भ्रष्टाचार केला नसेल, तुम्ही खरे आहात तर पुढे येऊन सांगायचा प्रयत्न करा, असा सल्लाही खडसेंनी दिला. महाराष्ट्रात अतिशय चुकीच्या पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रात सुरू आहे. एखाद्या व्यक्तीला काही चुकीचं वाटत असल्यास आरटीआयच्या माध्यमातून ती व्यक्ती माहिती घेऊ शकते. पण, दादागिरी करून, एखाद्याला खाली पाडून खच्चीकरण होत असेल तर हे चुकीचं आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री शिवसेनेचे आहेत. आता, त्यांच्याच पक्षातील कार्यकर्ते असं करत असतील तर ही दादागिरीच आहे. कोणताही पक्ष ही दादागिरी खपवून घेणार नाही, असेही रक्षा खडसेंनी म्हटले.
हिंसेचं समर्थन नाही - पटोले
काँग्रेसनेही हिंसेचे समर्थन करता येणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना किरीट सोमय्यांवरील हल्ल्याबाबत प्रश्न विचारला होता. त्यावर, कुठल्याही हिंसचं समर्थन करता येणार नाही, अशा शब्दात त्यांनी स्पष्टपणे मत मांडलं.
काय म्हणाले सोमय्या
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसैनिक अशा पद्धतीनं कटकारस्थान रचून हल्ला करतात, त्याचं वाईट वाटतं, असं किरीट सोमय्या म्हणाले. या प्रकरणी उद्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा भेट घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. शनिवारी पालिका कार्यालयाला सुट्टी होती. मग शिवसैनिक आत घुसलेच कसे? त्यांना आत कोणी सोडलं?, असे प्रश्नही सोमय्यांनी उपस्थित केले. भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमुळे मुख्यमंत्री ठाकरे अस्वस्थ आहेत. शिवसेनेचे नेते संजय राऊत, अनिल परब अडचणीत आहेत. हे दोन नेते मुख्यमंत्र्यांचा उजवा आणि डावा हात. दोघेही अडचणीत आल्यानं मुख्यमंत्री चिंतेत आहेत. त्यामुळेच हल्ल्याचा कट रचला गेला आणि मुख्यमंत्री कार्यालयातून सूचना झाल्यानंतरच हल्ला केला गेला, असा आरोप सोमय्यांनी केला.