पेट्रोल-डिझेलच्या दराने किचनचे बजेट कोलमडले ; किराणा, भाजीपाला महागला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:12 AM2021-07-05T04:12:14+5:302021-07-05T04:12:14+5:30

सचिन देव जळगाव : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असताना, दुसरीकडे दैनंदिन गरजेच्या किराणा ...

Kitchen budget collapses at petrol-diesel rates; Groceries, vegetables are expensive! | पेट्रोल-डिझेलच्या दराने किचनचे बजेट कोलमडले ; किराणा, भाजीपाला महागला !

पेट्रोल-डिझेलच्या दराने किचनचे बजेट कोलमडले ; किराणा, भाजीपाला महागला !

googlenewsNext

सचिन देव

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असताना, दुसरीकडे दैनंदिन गरजेच्या किराणा मालाच्या वस्तू व भाजीपालाही महाग झाला आहे. यामुळे सर्वसामान्य कुटुंबांना मोठ्या आर्थिक विवंचनेला सामोरे जावे लागत असून, परिणामी गृहिणींना घर चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

कोरोनामुळे आधीच अनेक नागरिकांच्या रोजगार व व्यवसायावर परिणाम झाल्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यात आता पेट्रोल व डिझेलचे दर १०० रुपये लिटरच्या वर गेल्यामुळे याचा परिणाम वाहतुकीच्या खर्चावरही झाला आहे. वाहतुकीचा खर्च वाढल्यामुळे दुसरीकडे वस्तूंच्या किमतीही वाढल्या आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे घर चालविण्याचे अर्थचक्र कोलमडले आहे. सर्व प्रकारच्या वस्तूंचे भाव गगनाला भिडल्यामुळे कुटुंब चालवावे तरी कसे, असा प्रश्न सर्व सामान्य नागरिकांना पडत आहे. निदान सरकारने किराणा मालाच्या वस्तूंचे दर तरी कमी करावेत अशी मागणी गृहिणींमधून केली जात आहे.

इन्फो :

असे वाढले पेट्रोल-डिझेलचे दर (ग्राफ)

पेट्रोल डिझेल

जानेवारी २०१८ ७८ रुपये ७१ पैसे ६३ रुपये २४ पैसे

जानेवारी २०१९ ७५ रुपये ३० पैसे ६५ रुपये ५१ पैसे

जानेवारी २०२० ८१ रुपये ७१ पैसे ७१ रुपये ०९ पैसे

जानेवारी २०२१ ९१ रुपये ५८ पैसे ८० रुपये ५१ पैसे

फेब्रुवारी - ९४ रुपये ०६ पैसे ८३ रुपये २० पैसे

मार्च - ९८ रुपये ६१ पैसे ८८ रुपये २५ पैसे

एप्रिल - ९८ रुपये ०२ पैसे ८७ रुपये ६३ पैसे

मे - ९७ रुपये ८७ पैसे ८७ रुपये ४८ पैसे

जून - १०१ रुपये ९३ पैसे ९२ रुपये ४४ पैसे

जुलै - १०६ रुपये ०८ पैसे ९६ रुपये ३७ पैसे

इन्फो :

पत्ता कोबी ५० रुपये किलो

एकीकडे पेट्रोल व डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत असतांना, दुसरीकडे सर्व पाले भाज्यांचे दरही गगनाला भिडले आहेत. गेल्या महिनाभरापासून गिलले, भेंडी, कारले, मिरची ५० रुपये किलोच्या वरच असून, यात पत्ता कोबीनेही चांगलाच भाव खाल्ला आहे. ही भाजी सध्या ५० रुपये किलो दराने विक्री होत आहे.

चवळी : ५० ते ६० रुपये किलो

दोडके : ५० रुपये किलो

दुधी भोपळा : ५० रुपये किलो

पालक : ६० रुपये किलो

कांदे : ४० रुपये किलो

पत्ता कोबी ५० रुपये किलो

इन्फो :

किराण मालाचा चढउतार सुरूच :

सध्या बाजारपेठेत भाजीपाल्याचे दर वाढलेले असतांना, किराणा मालाच्या दरात मात्र चढउतार सुरू आहेत. मागील आठवड्यापेक्षा या आठवड्यात विविध प्रकारच्या डाळी काहीशा स्वस्त झाल्या असून, तेल मात्र काहीसे महागच झाले आहे. यात चणा डाळ ७० रुपये किलो, उडीद डाळ १०५ रुपये किलो व मूगडाळ ११० रुपये किलो असताना, सोयाबीन तेल मात्र १५० रुपये किलोवर पोहचले आहे. तेलाचे भाव वाढल्यामुळे गृहिणींना सण-उत्सव साजरे करण्यासाठीही मर्यादा घालाव्या लागणार आहेत.

इन्फो :

ट्रॅक्टरची शेतीही महागली :

गेल्या काही महिन्यांपासून डिझेलचे दर मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे याचा परिणाम सध्या ट्रॅक्टरने शेतीच्या मशागतीवरही झाला आहे. यामध्ये ट्रॅक्टरने एका एकरात ट्रिलरने मशागत करण्यासाठी एक हजार रुपये दर आकारण्यात येत आहेत तर नांगरणीचे दीड............................................ रुपये रुपये प्रति एकर या प्रमाणे दर आकारण्यात येत आहेत.

इन्फो :

काय म्हणतात गृहिणी

एकीकडे किराणा मालाचे दर वाढलेले असतांना, दुसरीकडे पालेभाज्यांचे भाव खूपच वाढले आहेत. प्रत्येक भाजी १५ ते २० रुपये पावशेर मिळत आहेत. त्यामुळे घर कसे चालवावे, असा प्रश्न पडत आहे. सरकारने सर्वसामान्य नागरिकांचा विचार करून तेल, शेंगदाणे, साखर व इतर डाळींचे भाव तरी कमी करणे गरजेचे आहे.

गीता गायकवाड, गृहिणी

गेल्या काही महिन्यांपासून विविध प्रकारच्या डाळींचे भाव शंभर रुपये किलोच्या वर गेले असून, सोयाबीन तेलाचे भावही दीडशे रुपयांवर पोहचले आहे. दिवसेंदिवस ही महागाई वाढत असल्यामुळे, सर्व सामान्य नागरिकांना जीवन जगणे अवघड झाले आहे. तरी दुसरीकडे पालेभाज्यांचेही भाव वाढल्यामुळे, महिन्याच्या किचनचे बजेट कोलमडत आहे.

कल्पना दाभाडे, गृहिणी.

इन्फो :

दोन व्यापाऱ्यांच्या प्रतिक्रिया

सध्या पालेभाज्यांचे दर वाढण्याचे कारण म्हणजे शेतकरी बांधवांकडून बाजारपेठेत कमी प्रमाणात माल येत आहे. मागणी जास्त आणि आवक कमी असल्यामुळे हे दर वाढले आहेत. अजून आठवडाभराने पालेभाज्यांचे दर कमी व्हायला सुरू होईल.

जितू चौधरी, भाजीपाला व्यापारी

किराणा मालाच्या सर्वच वस्तूंच्या भावात सध्या चढउतार सुरू आहे. सध्या डाळींचे भाव कमी असले, तरी तेलाचे दर मात्र वाढतच आहेत. आता पावसाळा सुरू झाल्याने, येत्या काळात डाळींचे दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे.

अजय मुंगड, किराणा व्यापारी

Web Title: Kitchen budget collapses at petrol-diesel rates; Groceries, vegetables are expensive!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.