अमळनेर नगरपरिषदेच्या उपमुख्याधिकाऱ्यांवर चाकू हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2019 01:02 PM2019-11-03T13:02:19+5:302019-11-03T13:02:51+5:30
दोन संशयित ताब्यात
अमळनेर, जि. जळगाव : अमळनेर नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांच्यावर तिघांनी चाकू हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना २ रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास धुळे रस्त्यावर घडली.
संदीप गायकवाड रात्री ११ वाजेच्या सुमारास एका हॉटेलमध्ये पाण्याची बाटली घेण्यासाठी गेले होते. त्यांनतर ते हॉटेलच्या बाजूला जाऊन बसले. थोड्या वेळाने त्यांच्या अंगावर रक्त वाहताना दिसल्याने व्यवस्थापकाने त्यांचे शर्ट उचकावून पाहिले असता त्यांना चाकुचे वार लागलेले होते. त्यावेळी गायकवाड यांनी सांगितले की, एमएच १९, ७५०३ या क्रमांकाच्या मोटरसायकलवरून तीन जण आले आणि त्यांनी मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला व त्यांच्यावर चाकूने वार केले. त्यावेळी सचिन पाटील, राहुल ठाकूर, रमेश जैन यांनी त्यांना खाजगी दवाखान्यात नेले. मात्र तेथे डॉक्टर नसल्याने ग्रामीण रुग्णालयात नेले. तेथे प्राथमिक उपचार करून दाखल केले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान घटनेचे वृत्त कळताच पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, शरद पाटील, मिलिंद भामरे, ईश्वर सोनवणे, रवींद्र पाटील, दीपक माळी यांनी रात्रीच दोघं आरोपींना ताब्यात घेतले असून तिसरा एक फरार आहे.