अकलूद येथे तरुणावर चाकू हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 03:29 PM2018-10-14T15:29:46+5:302018-10-14T15:30:33+5:30
केवळ विचारलेला मोबाइल नंबर न दिल्याचा राग आल्यावरून एका तरुणावर चाकूहल्ला झाल्याची घटना अकलूद, ता.यावल येथे रविवारी सकाळी आठ वाजता घडली. चाकूहल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव सुकलाल काशिनाथ भिल (वय २२) असे असून, चाकूहल्ला करणारा सतीश रमेश सपकाळे यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे हे दोघे चुलत भाऊ आहेत.
फैजपूर, जि.जळगाव : केवळ विचारलेला मोबाइल नंबर न दिल्याचा राग आल्यावरून एका तरुणावर चाकूहल्ला झाल्याची घटना अकलूद, ता.यावल येथे रविवारी सकाळी आठ वाजता घडली. चाकूहल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव सुकलाल काशिनाथ भिल (वय २२) असे असून, चाकूहल्ला करणारा सतीश रमेश सपकाळे यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे हे दोघे चुलत भाऊ आहेत.
आरोपी सतीश सपकाळे याने सुकलाल भिल याच्याकडे त्याच्या साडूचा मोबाइल नंबर मागितला होता. मोबाईल नंबर न दिल्याने त्याचा राग येऊन सतीशने सुकलाल याच्या पोटावर चाकूने वार केला. या घटनेने अकलूज गावात एकच खळबळ उडाली होती. सुकलाल याला तातडीने भुसावळ येथे उपचारार्थ दाखल करून त्यानंतर पुढील उपचारासाठी जळगाव सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन आरोपी सतीश सपकाळे ह्याला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून घटनेत वापरलेला चाकूसुद्धा हस्तगत केला आहे.
जखमी सुकलाल भिल याच्या तक्रारीवरून सतीश सपकाळेविरुद्ध भा.दं.वि. ३०७ प्रमाणे जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि दत्तात्रय निकम, फौजदार जिजाबराव पाटील, सहाय्यक फौजदार विजय पाचपोळ, हवालदार विकास कोल्हे करीत आहे.