जाणून घ्या खान्देशच्या भूमीवर कुणाची होती मालकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 07:04 PM2018-01-01T19:04:48+5:302018-01-01T19:11:56+5:30
बहामनींना मिळविता आला नाही कधीही खान्देशचा भूभाग
विलास बारी /आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि.१ : खान्देशात १३४७ मध्ये बहामनी राजसत्ता स्थापन झाल्यानंतर दक्षिणेत एक प्रभावी राजवंश उदयाला आला. नंदुरबार व सुलतानपूर ‘सरकार’ वगळता खान्देशचा सर्व भाग दिल्लीच्या सुलतानांकडेच राहिला. त्यामुळे बहामनींना खान्देश मिळविता आला नाही. त्यामुळे खान्देशची खरी सूत्रे असीरगडच्या अधिपतीकडेच राहिली. या भूभागावर यादव, खजली व नंतर तुघलकांची सार्वभौम सत्ता असली तरी प्रत्यक्ष मालकी स्थानिक निकुंभ, अहीर व राजपूत अधिपतींकडे होती.
फारूकी राजवटीत थाळनेरला मुख्यालय
दिल्लीचा सुलतान फिरोजशहा तुघलक याने थाळनेरचा भाग १३७० मध्ये मलिक राजा याला जहागिरी दाखल दिला. मलिक राजाने तुघलकाची मर्जी केवळ एका लहानशा सेवेच्या बदल्यात मिळविली होती. दौलताबादचे सुफी संत शेख झैनुद्दीन यांनी या कामी मलिक राजाला मदत केली. या मदतीमुळे संपूर्ण फारूकी घराणे या सुफी संताचे चाहते झाले होते. जहागिरीची सनद दिल्ली येथून आणून मलिक राजाने विद्यमान धुळे जिल्ह्यातील थाळनेरला आपले मुख्यालय उभारले.
यादवांचे मांडलिक निकुंभांची अधिसत्ता
मलिक राजाने सावकाशपणे येथील अधिपतींना संपुष्टात आणून आपली सत्ता वाढविली. पूर्वेकडील वाघळीला एक राजपूत अधिपती अधिकारूढ होते. पितळखोरा टेकड्यांचा पायथा व कसारबारी घाटालगतच्या भागावर पूर्वी यादवांचे मांडलिक असलेल्या निकुंभांची अधिसत्ता होती. पूर्वेकडील भागावर गवळी राजा आसा अहीर यांची सत्ता असावी. थाळनेरच्या उत्तरेकडील सोनगरीवर दुसºया राजपुतांची सत्ता होती. कालांतराने सर्व अधिपतींनी फारूकीचे मांडलिकत्व पत्करले.
खान्देशचा ‘सिपाह-सालार किताब
थाळनेर व कुरुंदोचा ताबा घेतल्यानंतर मलिक राजाला बागलाणच्या वहीजी नामक अधिपतीशी सामना करावा लागला. मात्र या मोहिमेत मलिकला हत्ती व प्रचंड धनप्राप्ती झाली. ही लूट मलिकने राजा फिरोजशहा तुघलकाकडे पाठविली. फिरोजशहा यांनी खुश होऊन मलिकला बढती देऊन खान्देशचा ‘सिपाह-सालार’ हा किताब दिला. १३८२ मध्ये फिरोजशहा तुघलक वार्धक्याने कमकुवत झाल्याने मलिक राजाने दिल्लीस खंडणी पाठविणे बंद करीत आपले स्वातंत्र्य घोषित केले.
खान्देशच्या सुपीक प्रदेशावरून वाद
खान्देशच्या सुपीक प्रदेशावरून गुजरात व फारुकींचे वारंवार वाद निर्माण होत होते. ते थांबविण्यासाठी मलिक राजा फारूकीने आपल्या मुलीचे लग्न माळव्याच्या दिलावर खान यांच्या मुलीसोबत केले. तसेच आपल्या मुलाचा विवाह दिलावरच्या मुलीसोबत लावून दिला होता. या परस्पर विवाहसंबधांमुळे फारूकींचे स्थान बळकट झाले.