खान्देशातील युवकांचा सूरतमध्ये ज्ञान-यज्ञ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 09:38 PM2018-11-25T21:38:34+5:302018-11-25T21:40:29+5:30
६०० मुलांचे उजळले बालपण
चुडामण बोरसे,
जळगाव : दान दिल्याने ज्ञान वाढते... त्या ज्ञानाचे मंंदिर हे...गीतकार जगदीश खेबुडकर यांच्या या गीताप्रमाणे ्नज्ञानाच्या या मंदिराच्या उभारणीचे काम सूरत येथे खान्देशातील काही युवकांनी सुरु केले आहे. या युवकांनी प्रज्ज्वालित केलेल्या या ज्ञानयज्ञात जवळपास ६०० बालकांचे बालपण उजळून निघाले आहे.
सूरत येथे गेलेले खानदेशातील काही युवक ‘भरारी फाऊंडेशन’ च्या माध्यमातून ‘मुस्कान’ अर्थात ‘झोपडपट्टी से एक कदम शिक्षा की ओर’ ही एक शैक्षणिक चळवळ चालवित आहेत. यातून गेल्या सहा वर्षात जवळपास ५०० ते ६०० मुले शिक्षणाच्या प्रवाहात आली आहेत. विशेष म्हणजे सूरतेत रोजगारासाठी आलेल्या पालकांच्या मुलांसाठी हा उपक्रम आहे.
या फाऊंडेशनचे ९० सदस्य आहेत. यापैकी ५५ जण खान्देशातील आहेत. या अभियनात मुलांना सकाळी आणि सायंकाळचे दोन - दोन तास असे चार तास शिकविले जाते. फाऊंडेशनचे सदस्यच गुरुजींचे काम करीत असतात.
शिक्षणासोबत मुलांना रोज विविध खाद्य पदार्थ दिले जातात. याशिवाय पुस्तके दप्तर, ड्रेस, बुट असे साहित्य दिले जाते. याशिवाय महिन्यातून एकदा या मुलांची आरोग्य तपासणी केली जाते. एवढेच नाही तर विविध शाळांना भेटी देऊन शैक्षणिक सहलही आयोजित केली जाते.
या ‘मुस्कान’ अभियानचे व्यवस्थापन वेडू पाटील (भोणे ता. धरणगाव) व मेघना पटेल यांच्याकडे आहे. या अभियानात त्यांचे मोलाचे योगदान आहे. शिक्षणाव्यतिरिक्त संस्थेद्वारा विविध स्पर्धा परीक्षा-करियर मार्गदर्शन शिबीर, विविध सेमिनार व पथनाट्ये, सामाजिक समस्यांवर जनजागृती आदी उपक्रम राबवले जातात. या फाऊंडेशनमध्ये विविध राज्य, धर्म, जाती भाषा असलेले एकूण ९० सदस्य आहेत. त्यात शिक्षक, वकील, डॉक्टर, लुम्स वर्कर, डायमंड वर्कर, साडी मार्केट असे विविध कार्य क्षेत्राशी संबंधित लोक आहेत.
फाऊंडेशनच्या या शैक्षणिक कामात सूरत येथील ज्ञान ज्योत विद्यालयाचे संचालक लालजी नकुम, मुख्याध्यापक मनोज सिंह, श्रीनिवास मिटकूल, चेतन सिरवी, भावेश जोशी, गोपाळ राणावत, सपना पटेल, चंदन शर्मा, प्रदीप राठोड, प्रतीक्षा मौय, सौरभ परिहार इत्यादी मुस्कान अभियान अभियान चे मुख्य स्वयंसेवक आहेत. फाऊंडेशनचा मुख्य उद्देश्य सेवा व परिवर्तन आहे. या संस्थचे कार्य २०११ पासून सुरू आहे. सन २०१२ मध्ये संस्थेची नोंदणी करण्यात आली. भरारी फाउंडेशनचे संस्थापक नितिन सैंदाणे असून अध्यक्ष भागवत पाटील व कार्याध्यक्ष जितेंद्र सोनवणे तसेच आर्थिक व्यवहार हे राजेंद्र पाटील पाहतात.
‘मुस्कान’ अभियानातील एक शाळा एका ठिकाणी पाच महिने चालवली जाते. त्यानंतर जर पालक मुलांच्या शिक्षणासाठी स्थायिक होण्यास तयार असतील तर अश्या मुलांना वेगवेगळ्या खाजगी शाळांमध्ये विद्यार्थी दत्तक योजनेद्वारा त्यांना प्रवेश मिळवून दिला जातो. आतापर्यंत भरारी फाउंडेशनच्या या अभियानात ५५० मुलांना साक्षर करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे सूरतमध्ये स्थलांतरित होऊन येणाऱ्या लोकांमध्ये महाराष्ट्रातील लोकांचा समावेश अधिक आहे. हे अल्पकालीन स्थलांतरीत लोक विविध ठिकाणी झोपडी बांधून राहतात. आधीच त्यांच्या पोटाची चिंता असल्याने मुलांना शिक्षण तर दूरच राहिले. त्यांच्या मुलांसाठी ही चळवळ आता आकार घेऊ लागली आहे. या मुलांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करून त्यांना शाळेची गोडी लागावी म्हणून प्राथमिक स्तरावर जिथे राहतात तिथेच शिक्षणाची सोय केली जाते.
फाऊंडेशनचा मुख्य उद्देश्य सेवा व परिवर्तन आहे. आमचे आई- वडील ज्यावेळी सूरतमध्ये आले. त्यावेळी त्यांनाही मोठाच संघर्ष करावा लागला. ती वेळ नवीन आलेल्या लोकांवर येऊ नये, यासाठी फाऊंडेशनने ही शैक्षणिक चळवळ उभारली आहे. यातून सेवाही घडत आहे... आणि बालकांच्या जीवनात परिवर्तनही घडत आहे.
-नितीन सैंदाणे, संस्थापक, भरारी फाऊंडेशन, सूरत.