कोगटा, तोतला यांनी घेतले कोटींच्या घरात कर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:12 AM2021-06-18T04:12:14+5:302021-06-18T04:12:14+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : पुणे आर्थिक गुन्हे शाखेने अटक केलेल्यांनी बीएचआर पतसंस्थेकडून कोटीच्या घरात कर्ज घेतले असून त्याची ...

Kogata, Totala took crores of house loan | कोगटा, तोतला यांनी घेतले कोटींच्या घरात कर्ज

कोगटा, तोतला यांनी घेतले कोटींच्या घरात कर्ज

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : पुणे आर्थिक गुन्हे शाखेने अटक केलेल्यांनी बीएचआर पतसंस्थेकडून कोटीच्या घरात कर्ज घेतले असून त्याची परतफेड दाखविण्यात आली असली तरी प्रत्यक्षात ठेवीदारांच्या पावत्या घेऊन त्या कर्जात चुकीच्या पध्दतीने समायोजित केलेल्या आहेत. कर्जदार तुपाशी तर ठेवीदार उपाशी अशी गत या प्रकरणात झालेली आहे. प्रेम कोगटा व जयश्री अंतिम तोतला यांनी तर पावणे दोन कोटी रुपयांचे कर्ज घेतलेले आहे. दरम्यान, सीआयडीने केलेल्या लेखापरीक्षणात संस्थेने नियमबाह्य कर्जाची खिरापत वाटल्याचेही उघड झाले आहे.

दरम्यान, पुणे पोलिसांनी जप्त केलेली कागदपत्रे व इतर पुराव्यांचे फॉरेन्सिक ऑडिट केले आहे. त्यातून हा प्रकार उघडकीस आला आहे. या गुन्ह्यात अटक केलेले प्रेम कोगटा यांनी बीएचआरकडून १ कोटी ८० लाख ३९ हजार ९७३ रुपये कर्ज घेतले होते, तर भागवत भंगाळे यांनी ९० लाख ८२ हजार ७२९ रुपये कर्ज घेतले होते. भागवत भंगाळे यांनी २२ मे २०१८ रोजी कर्जाची परतफेड केल्याचा दाखला लोकमत कार्यालयात आणून दिला होता. जयश्री शैलेश मणियार यांनी ६४ लाख ५५ हजार २८३ रुपये, संजय भगवानदास तोतला यांनी ६४, लाख १ हजार ७६२ रुपये, जयश्री अंतिम तोतला यांनी १ कोटी ६८ लाख ३५ हजार ७० रुपये कर्ज घेतले होते. या शिवाय यांच्याच कुटुंबात आणखी इतरांनी नियमबाह्य कर्ज घेतल्याचे लेखापरीक्षण अहवालात म्हटले आहे.

औरंगाबादमध्येही महत्त्वाचे कागदपत्रे हस्तगत

भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) या पतसंस्थेमध्ये अवसायक जितेंद्र कंडारे व त्याच्या साथीदारांनी केलेल्या गैरव्यवहाराचे पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने तब्बल एक ट्रक भरुन पुरावे गोळा केले आहेत. त्यात प्रामुख्याने बीएचआरसह वेगवेगळ्या १२ ठिकाणी टाकलेल्या धाडीत मिळालेली कागदपत्रे, शपथपत्रे, तसेच लॅपटॉप, पीसीओसह मोठ्या प्रमाणावर डिजिटल साहित्यही हस्तगत करण्यात आले आहे. याबरोबरच औरंगाबाद व अन्य ठिकाणी केलेल्या तपासणीत अनेक महत्त्वपूर्ण कागदपत्रे पोलिसांच्या हाती लागली आहेत. त्यातूनच अंबादास आबाजी मानकापे (रा.औरंगाबाद) यांना अटक झाली आहे.

संगणकातील नोंदी डिलीट, नियमबाह्य कर्ज

लेखापरीक्षणात काही पुरावे आढळून येऊ नये म्हणून संस्थेच्या संगणकातील महत्त्वाच्या नोंदी डिलीट करण्यात आलेल्या आहेत तर काही प्रकरणात दप्तरच गायब झालेले आहे किंवा जाणूनबुजून लेखापरीक्षकांपुढे दप्तर सादर केलेले नाही. कर्जाच्या नोंदी संगणकातून डिलीट केल्याचे लेखापरीक्षकांच्या अहवालात म्हटले आहे. अंतिम भगवानदास तोतला यांना ६० लाख, त्यांची पत्नी जयश्री यांना ६० लाखाचे नियमबाह्य कर्ज वाटप केल्याचे लेखापरीक्षण अहवालात म्हटले आहे.

--

Web Title: Kogata, Totala took crores of house loan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.