कोजागरी : उपवास, पूजन व जागरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 11:37 PM2019-10-13T23:37:24+5:302019-10-13T23:37:45+5:30
कोजागरी किंवा शरद पौर्णिमा ही अश्विन महिन्यात येणारी पौर्णिमा. शरद ऋतूमध्ये पौर्णिमा येत असल्याने तिला शरद पौर्णिमाही म्हणतात. या ...
कोजागरी किंवा शरद पौर्णिमा ही अश्विन महिन्यात येणारी पौर्णिमा. शरद ऋतूमध्ये पौर्णिमा येत असल्याने तिला शरद पौर्णिमाही म्हणतात. या दिवशी साक्षात लक्ष्मी पृथ्वीतलावर उतरते आणि मध्यरात्री को जागरती... असे विचारत असते. ती पाहते की कोण कोण जागा आहे म्हणजे कोण सजग आहे आणि ज्ञानासाठी आतुर आहे. वामन पुराणात दीपदान जागर असे म्हटले आहे या दिवशी बळीराजाची देखील पूजा करतात. या दिवशी चंद्र हा पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. तसेच रात्री लक्ष्मी आणि ऐरावतावर बसलेल्या इंद्राची पूजा केली जाते. उपवास, पूजन व जागरण या तिन्ही गोष्टी या व्रतात समाविष्ट आहेत. पूजा झाल्यावर पोहे व नारळाचे पाणी आप्तेष्टांना दिले जाते. चंद्राला आटवलेल्या दूधाचा नैवेद्य दाखवतात. ब्रह्म पुराणात या व्रताची कथा थोडी निराळी सांगितली आहेत. रस्ते झाडून स्वच्छता करून घरे सुशोभित करावी, गृहदाराजवळ अग्नि प्रज्वलित करून त्याची पूजा करावी पृथ्वीची पूजा करून त्याला दूध खिरीचा नैवैद्य दाखवावा यादिवशी आटवलेल्या दुधात केशर पिस्ता, बदाम, वेलदोडे, जायफळ, साखर घालून लक्ष्मीदेवीला नैवद्य अर्पण करतात. दुधामध्ये मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडतात. मग ते दूध प्राशन करतात. आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा या पौर्णिमेला खूप महत्त्व आहे. दमा किंवा अस्थमा यासारख्या आजारांसाठी हे औषध खिरी मध्ये मिसळून कोजागिरीच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात ठेवले जातात. चंद्राचे किरण या खिरीवर पडल्याने त्याचा गुणधर्म बदलतो आणि अशी खीर आजारी व्यक्तीला दिल्यास तिला आराम मिळतो, असे मानले जाते इतर राज्यांमध्ये सुद्धा हा उत्सव साजरा केला जातो. श्रीलक्ष्मीची सेवा करण्याचा हा एक उत्तम योग आहे. लक्ष्मी अनेक प्रकारची आहे. जसे वित्त लक्ष्मी, गुणलक्ष्मी लक्ष्मी, भाग्य लक्ष्मी... अशी सर्वच प्रकारची लक्ष्मी ही जागृत माणसाला मिळते. देवी महालक्ष्मी ही परमदयाळू आहे, कृपाळू आहे, सर्वांचे हित करणारी आहे म्हणून या पौर्णिमेला जास्त महत्व आहे. याच पौर्णिमेच्या रात्री देवांचा राजा इंद्र्रसुुद्धा पृथ्वीवर फिरत असतो व तोसुद्धा विचारत असतो कोण कोण जागा आहे.केवळ कोजागिरीलाच नाही तर सदैव माणसाने जागे राहणे आपल्या हितासाठी ते आवश्यक आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात... माणसाने सदैव प्रयत्नशील राहावे व उत्तम आयुष्य जगावे यासाठीच कदाचित अशा उत्सवांची योजना केलेली असावी. यामुळे मनुष्याला जीवन जगण्याची संजीवनी मिळत असते.
- भाऊराव महाराज पाटील, मुक्ताईनगर