खाटेला पाठ असणाºया वयात कोळगावच्या वृद्धाची सायकलवर टांग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 07:00 PM2017-12-28T19:00:43+5:302017-12-28T19:04:13+5:30
वयाच्या ८० व्या वर्षी देखील भल्या पहाटे सायकलवर भ्रमंती करीत खेडोपाडी भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करणारे कोळगाव, ता.भडगाव येथील भगवान जगन्नाथ माळी हे नवतरूणांसाठी सायकलचे महत्व पटून देत आहेत.
आॅनलाईन लोकमत
खेडगाव, ता-भडगाव,दि.२८ - वयाच्या ८० व्या वर्षी देखील भल्या पहाटे सायकलवर भ्रमंती करीत खेडोपाडी भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करणारे कोळगाव, ता.भडगाव येथील भगवान जगन्नाथ माळी हे नवतरूणांसाठी सायकलचे महत्व पटून देत आहेत.
साठी-पासष्टी नंतर खरेतर खाटेला पाठ लागते. परंतु खाटेला पाठ म्हणजे दुखण्याला आमंत्रण ही खुणगाठ पक्की बांधुन, आजही माळी हे दुचाकी वाहन घेण्याची ऐपत असतांनाही सायकल सोडत नाहीत. वयाच्या दहाव्या वर्षापासून सायकल चालविण्यास शिकलेले माळी आजवर सायकल हेच आपले जीवन मानत संसारचक्र ते फिरवित आहेत.
असे जुळले सायकलीशी नाते...
माळी यांच्या लहानपणी घरात अठराविश्वे दारिद्रय होेते. पाणी पिण्यास भांडे नाही.'केयना फोतरा (केळीचे सालटे) खाऊन त्यांनी दिवस काढले. आधी चहा हॉटेलमध्ये कपबशा धुण्याचे काम केले. नंतर कोळगाव बसस्थानकात चहाची टपरी टाकली. एक आणे चहा पासुन व्यवसाय केला. चहाच्या व्यवसायाला काही जण कमी लेखतात. मात्र माळी यांनी या व्यवसायावरच पाच एकर शेती, दोन मुलींचे लग्न, दोन मुलांचा संसार ओढला. चहाचा व्यवसाय मुलाकडे दिला आणि त्यांनी सायकलसोबत नाते जोडले.
सायकलीवर भाजीपाला विक्रीचा व्यवसाय
माळी समाजाचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय प्रचलित आहे. त्यानुसार त्यांनी खेडोपाडी सायकलवर फिरत भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरु केला. पहाटे लवकर उठत सायकलवर भ्रमंती करीत आजूबाजूच्या खेड्यात त्यांनी भाजीपाला विक्रीस सुरुवात केली. शरीर थकले तसे भाजीपाल्याचे जड वजन पेलवेना म्हणून हलके वजन असलेला लसुण आज ते खेडोपाडी विक्री करीत आहेत.
कान्हुमातेच्या वह्यांचा उपासक
भगवान माळी हे बरीच वर्ष वही मंडळात होते. कान्हुमातेच्या वह्या त्यांनी अनेक गावातून गायल्या आहेत. अशा कार्यक्रमात रात्रभर जागरणासाठी ते राजा शनीविक्रम या नाटिका सादर करीत होते. या कलेपुढे तमाशा मंडळाचे कार्यक्रम फिके पडत असल्याचा अनुभव ते सांगताना, ' माय कुवारी, बाप ब्रम्हाचारी, मुलगा जन्मता घरी, तोच मुलगा बापाच्या लग्नात आहेर करी...! असा नाटकातला संवाद तोंडपाठ मात्र खड्या आवाजात ते म्हणतात.