कोल्हे कुटुंबीयांचे जळगाव महापालिकेत वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 13:12 IST2018-07-11T13:12:29+5:302018-07-11T13:12:32+5:30
ललित कोल्हेही बनले महापौर

कोल्हे कुटुंबीयांचे जळगाव महापालिकेत वर्चस्व
जळगाव : मनपा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरु झाली आहे. महानगरपालिकेच्या स्थापनेपासून काही कुटुंबातील सदस्यांचे नेहमी वर्चस्व राहिले आहे.
नगरपालिकेपासून तर सध्याच्या मनपात कोल्हे कुटुंबातील अनेक सदस्य नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. तत्कालीन नगरपालिकेत पंडितराव कोल्हे यांनी नगराध्यक्षपद देखील भूषविले. तसेच अनेक तीन पंचवार्षिकपर्यंत ते नगरसेवक म्हणून निवडून आले.
विजय कोल्हे व दिलीप कोल्हे यांचेही राहिले वर्चस्व
पंडीतराव कोल्हे यांच्यानंतर त्यांच्या मुलांनी देखील त्यांचा राजकीय वारसा पुढे नेला. विजय कोल्हे हे गेल्या २५ वर्षांपासून महानगरपालिकेत निवडून येत आहे. सध्याच्या महापालिकेत देखील ते नगरसेवक आहेत. मनसेतून भाजपात प्रवेश केल्याने त्यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला आहे. दिलीप कोल्हे हे सुद्धा तीन पंचवार्षिक नगरसेवक राहीले. जुन्या जळगावभागात कोल्हे कुटूंबियांचे वर्चस्व नेहमीच राहिले आहे.
पहिल्या महापौरपदाचा मान कोल्हे कुटुंबीयांनाच
मनपाची स्थापना २००३ मध्ये झाल्यानंतर शहराच्या प्रथम महापौर होण्याचा मान हा देखील कोल्हे कुटुंबीयांनाच मिळाला. विद्यमान नगरसेविका आशा कोल्हे यांनी पहिल्या महापौरपदाचा मान मिळाला होता. यासह विजय कोल्हे यांच्या पत्नी सिंधुताई कोल्हे यादेखील तत्कालीन नगरपालिकेत नगराध्यक्ष राहिल्या.
ललित कोल्हेही बनले महापौर
ललित कोल्हे यांनी आजोबा व वडील यांचा राजकीय वारसा पुढे सुरु ठेवला आहे. महापौर म्हणूनही त्यांना सुरेशदादा जैन यांनी संधी दिली. दोन दिवसापूर्वीच त्यांनी भाजपात प्रवेश केला असून त्यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला आहे. दिलीप कोल्हे यांचे चिरंजीव परेश कोल्हे हे देखील राष्टÑवादी काँग्रेसमध्ये आहेत.