कोळी समाजबांधवांना १०० टक्के खावटी कर्ज मिळावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2020 03:49 PM2020-10-12T15:49:24+5:302020-10-12T15:50:24+5:30
कोळी व इतर अनुसूचित जमातीच्या आदिम लोकांना १०० टक्के खावटी अनुदान मिळावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
उत्राण, ता.एरंडोल : उत्राण गावातील आदिवासी कोळी, मल्हार जमाती, आदिवासी टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी व इतर अनुसूचित जमातीच्या आदिम लोकांना १०० टक्के खावटी अनुदान मिळावे, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन एरंडोल येथे आमदार चिमणराव पाटील यांची भेट घेऊन समाजबांधवांनी दिले.
आदिवासी संघर्ष समिती एरंडोल तालुकाध्यक्ष आकाश कोळींसह एरंडोल पंचायत समिती सभापती अनिल रामदास महाजन, आदिवासी संघर्ष समिती एरंडोल तालुका उपाध्यक्ष नितीन ठाकरे, सामाजिक कार्यकर्ते मुकुंदा पाटील, सलमान तडवी, विनोद कोळी, संतोष मोरे, समिती पदाधिकारी व मान्यवरांनी ही भेट घेतली.
आदिवासी कोळी समाज अद्यापही १०० टक्के खावटी अनुदानापासून वंचित आहे. त्यांना न्याय मिळावा व त्यांच्यावर होणारा अन्याय दूर व्हावा यासाठी विद्यमान आमदार पाटील यांनी शासन दरबारी आवाज उठवावा व संबंधित आदिवासी मंत्रालयात पाठपुरावा करावा या हेतूने हे निवेदन देण्यात आले आहे.
आमदारांनी या विषयांवर चर्चा करून शासन दरबारी आवाज उठवून योग्य न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले.