कोपर्डी प्रकरण : अजित पवारांच्या नेतृत्त्वात जळगावात मूक मोर्चा

By admin | Published: July 13, 2017 03:03 PM2017-07-13T15:03:59+5:302017-07-13T15:31:33+5:30

कोपर्डी बलात्कार-हत्या प्रकरणातील आरोपींना अद्याप शासन झालेले नाही.याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीनं राज्यभरात निषेध मोर्चा काढला

Kopardi Case: Silent Front in Jalgaon led by Ajit Pawar | कोपर्डी प्रकरण : अजित पवारांच्या नेतृत्त्वात जळगावात मूक मोर्चा

कोपर्डी प्रकरण : अजित पवारांच्या नेतृत्त्वात जळगावात मूक मोर्चा

Next
ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 13 - अमानुष अत्याचारानंतर शाळकरी मुलीची हत्या झाल्याच्या घटनेने वर्षभरापूर्वी संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला होता.  ‘कोपर्डी’ची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून दिलेली आश्वासने मात्र अजून पूर्ण झालेली नाहीत. गावाला वर्षभरात ना माध्यमिक विद्यालय मिळाले, ना आरोग्य उपकेंद्र. पोलीस चौकी कागदोपत्री मंजूर झाली; पण प्रत्यक्षात उभी राहिलेली नाही. महत्त्वाचे म्हणजे या घटनेला वर्ष लोटूनही अद्याप नराधमांना शासन झालेले नाही.
 
या घटनेचा निषेध करण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष स्मिता पाटील, आमदार डॉ.सतीश पाटील सहभागी झाले होते.
 
साता-यात राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीचा मूकमोर्चा
कोपर्डी बलात्कार व हत्या प्रकरणातील आरोपींना अद्याप शासन झालेलं नाही. त्याचबरोबर या खटल्याचे कामकाज आश्वासन देऊनही फास्ट ट्रॅक कोर्टात होत नाही. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने गुरुवारी साता-यातून मूकमोर्चा काढण्यात आला.

अहमदनगरमध्ये कोपर्डीतील निर्भयाच्या घरासमोर तिचे स्मारक बांधण्यात आले आहे. त्याचे नाव युगंधरा स्मारक असे असून गुरुवारी कडेकोट बंदोबस्तात येथे सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली.

कोपर्डीला मिळालेल्या आश्वासनांचे काय झाले? याचा मागोवा घेण्यासाठी ‘लोकमत’ने कोपर्डीला भेट दिली. मुलीचे कुटुंब आजही त्या घटनेने सुन्न आहे. आर्थिक मदतीचे आम्हाला दिलेले आश्वासन सरकारने पाळले, असे मुलीच्या वडिलांनी सांगितले. मात्र गावाला आवश्यक सुविधा मिळालेल्या नाहीत. गावात चौथीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे. त्यानंतर मुलांना चार किलोमीटरवर कुळधरण किंवा शिंदे गावात जावे लागते. गावातील दोनशेहून अधिक मुले-मुली परगावी शाळेत जातात. त्यासाठी केवळ एक एस.टी. बस येते. अनेकांना सायकलवरुन किंवा पायपीट करत शाळेत जावे लागते. भैय्यूजी महाराजांनी मुलींसाठी दोन मिनी व्हॅन दिल्या. मात्र, त्याही अपुऱ्या पडतात. शासनाने गावातच अनुदानित माध्यमिक विद्यालय सुरु करावे, अशी ग्रामस्थांची मागणी होती. मात्र, त्याचा विचार झालेला नाही. कोणत्याही संस्थेने शाळेचा प्रस्ताव दिलेला नसल्याचे माध्यमिक शिक्षण विभागाचे म्हणणे आहे. गावात आरोग्य उपकेंद्राला शासनाने मंजुरी दिली. इतर आरोग्य केंद्रातील पदे येथे समायोजित करुन ते चालवा, असा आदेश आहे. त्याच्यासाठी जागेचा शोध सुरू आहे. ग्रामपंचायतने देऊ केलेल्या एका खोलीत तात्पुरते उपकेंद्र सुरु करण्याचे प्रस्तावित आहे. घटनेनंतर वर्षभर मुलीच्या घरासमोर पोलिसांच्या राहुट्या व बंदोबस्त आहे. आरोपीच्या घरालाही बंदोबस्त आहे. कुळधरण येथे कायमस्वरुपी पोलीस चौकी उभारण्याचे शासनाने आश्वासन दिले. चौकी मंजूर झाली. मात्र, त्यासाठी जागाच नाही. पोलीस तात्पुरत्या राहुट्यांत कधी कुळधरण तर कधी कोपर्डीला असतात. गावासाठीचा कोपर्डी- राक्षसवाडी हा पाच किलोमीटरचा सव्वा कोटीचा रस्ता मंजूर झाला आहे. मात्र, त्याचेही काम प्रत्यक्षात सुरु झालेले नाही. रस्त्याच्या भूमिपूजनाचा फलक जानेवारीतच लागला आहे. कोपर्डीचा खटला नगरच्या सत्र न्यायालयात सुरु आहे. त्याचा निकाल लागल्यानंतरच न्याय मिळतो की नाही हे ठरेल, असे तिच्या कुटुंबीयांनी सांगितले. मुलीच्या हत्येनंतर शाळेने तिच्या विम्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाला पाठविला. मात्र, तो सुद्धा अद्याप मंजूर झालेला नाही. मुलीचे स्मारक भैय्यूजी महाराज यांनी अत्याचारित मुलीचे तिच्या घरासमोर ‘युगंधरा’ हे स्मारक उभारले आहे. न्यायालयाच्या निकालानंतर मुलीचा ‘ब्रॉण्झ’ चा पुतळा बसविण्याचे नियोजन आहे, सूर्योदय परिवाराचे सदस्य भाऊराव पाटील व समीर पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले. १३ जुलैला प्रथम स्मृतिदिनी भैय्यूजी महाराज व मुलीच्या आईच्या हस्ते स्मारकाचे लोकार्पण होईल.

Web Title: Kopardi Case: Silent Front in Jalgaon led by Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.