भरीत पार्टीतून राजकीय समीकरणांची ‘कोशंबिर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:15 AM2021-01-21T04:15:25+5:302021-01-21T04:15:25+5:30
उपमहापौरांच्या पार्टीकडे आमदारांनी फिरवली पाठ : शेवभाजीच्या पार्टीनंतर या पार्टीचीही चर्चा लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महापालिकेत सत्ताधारी ...
उपमहापौरांच्या पार्टीकडे आमदारांनी फिरवली पाठ : शेवभाजीच्या पार्टीनंतर या पार्टीचीही चर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महापालिकेत सत्ताधारी भाजपमधील गटबाजी जगजाहीर असून, भाजपातील अनेकजण महापौर, उपमहापौर पदासह विधानसभेसाठीदेखील इच्छुक आहेत. त्यातच विधानसभा निवडणुकीआधी सुनील खडके यांनी दिलेल्या शेवभाजीच्या पार्टीची चांगलीच चर्चा रंगली होती. आता पुन्हा उपमहापौर सुनील खडके यांनी रविवारी आपल्या शेतात दिलेल्या भरीत पार्टीची चर्चा रंगली आहे. भरीत पार्टीतून राजकीय समीकरणांची ‘कोशंबिर’ तयार केली जात असून, यासाठी आता पार्ट्यांची ‘डिप्लोमसी’ सुरू झाली आहे.
रविवारी उपमहापौर सुनील खडके यांनी मनपातील सत्ताधारी नगरसेवकांसह सर्वच पक्षातील राजकीय पदाधिकारी व मनपातील अधिकाऱ्यांसाठी ममुराबाद शिवारातील आपल्या शेतात भरीत पार्टीचे आयोजन केले होते. माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी पक्षांतर केल्यानंतर लेवा समाजाला जवळ करण्याचे आव्हान भाजपला पार पाडावे लागणार असून, सुनील खडके हे भाजपसाठी महत्त्वाचे आहेत. म्हणून, खडसे यांच्या पक्षांतरानंतर सात महिने मुदतवाढ दिलेल्या उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे यांचा पक्षाने तडकाफडकी राजीनामा घेत, सुनील खडके यांना उपमहापौरपदाची संधी दिली. त्यातच मनपात सत्ता येऊन भाजपला मार्च महिन्यात अडीच वर्ष पूर्ण होणार आहेत. महापौर व उपमहापौरपदासाठी मार्च महिन्यात पुन्हा निवडणूक होणार असून, खडसे यांचा पक्षांतराचा फटका या निवडणुकीत बसू नये म्हणून भाजपकडून सावध भूमिका घेतली जात आहे. त्यातच खडके यांना पुन्हा तीन ते चार महिन्यांची मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे खडके यांच्या भरीत पार्टीला मोठ्या नेत्यांसह अनेक पदाधिकारी व नगरसेवकांनी हजेरी लावली असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
गिरीश महाजनांची उपस्थिती, आमदार भोळेंनी फिरविली पाठ
मनपासह अनेक निवडणुकांमध्ये भाजपचे संकटमोचक ठरलेले माजी मंत्री गिरीश महाजन सध्या शहरवासियांसाठी ‘मिस्टर इंडिया’ ठरले आहेत. उपमहापौरांच्या भरीत पार्टीत गिरीश महाजन यांनी जातीने हजेरी लावली. मात्र, शेवभाजी पार्टीपासून आमदार सुरेश भोळे यांना विधानसभेसाठी आव्हान देणाऱ्या खडकेंच्या पार्टीत आमदार सुरेश भोळे यांनी इंदूरला नातेवाईकांचे लग्नाचे कारण देत या पार्टीकडे पाठ फिरवली होती. आमदार भोळेंसह गटनेते भगत बालाणी, सभागृह नेते ललित कोल्हे हेदेखील या पार्टीत गेले नसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. खडके यांनी उपमहापौर आपल्या दारी, प्रभाग समिती दौरा, जनता दरबार या उपक्रमातून आपली छबी तयार करण्याचा प्रयत्न केला जात असताना, दुसरीकडे सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांसाठी आयोजित केलेल्या भरीत पार्टीमुळे आतापासूनच राजकीय समीकरणे तयार केली जात आहेत.