कोविड योध्देच झाले बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 12:15 PM2020-05-20T12:15:05+5:302020-05-20T12:15:30+5:30
जळगाव : कोरोना विरुध्दच्या लढाईत फ्रंटवर राहणारे तीन योद्धेच आज कोरोना बाधित झाले. जळगाव शहरात मंगळवारी ३ कोरोनाचे रुग्ण ...
जळगाव : कोरोना विरुध्दच्या लढाईत फ्रंटवर राहणारे तीन योद्धेच आज कोरोना बाधित झाले. जळगाव शहरात मंगळवारी ३ कोरोनाचे रुग्ण आढळून आले यामध्ये दोन पोलीस आणि कोवीड रुग्णालयातील एका २९ वर्षीय प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचा समावेश आहे. तीन रुग्ण आढळल्यानंतर शहरात आता कोरोना बाधीतांची संख्या ६७ झाली आहे.
शहरात नागरिकांसोबत आता कोरोनाविरोधात लढा देत असलेल्या पोलीस व वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाच कोरोनाची बाधा होवू लागली आहे. मंगळवारी बाधा झालेले दोन्हीही पोलीस मालेगावहून ड्युटी करून परत आले होते. तसेच त्यांना लक्षणे आढळल्यानंतर दोघांनाही गेल्या ९ दिवसांपासून होम क्वारंटाईन करण्यात आले होते. तर कोवीड रुग्णालयात आढळलेला २९ वर्षीय प्रशिक्षणार्थी डॉक्टरला काही लक्षणे आढळल्यानंतर त्यांचे स्वॅब घेण्यात आले होते. दरम्यान, कोरोनाचा अहवाल पॉझीटीव्ह आल्यानंतर संबधित डॉक्टरच्या संपर्कात आलेल्या चार जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. बाधित रुग्णांचे स्वॅब घेण्याचे काम या कनिष्ठ निवासी डॉक्टरांकडे होते.
आता त्यांनाच बाधा झाली आहे. कोविड हॉस्पीटलमधील डॉक्टरांसाठी असलेल्या वसतिगृहात ते वास्तव्यास आहेत.
होम क्वॉरंटाईन असताना बाहेर फिरणाºया चौघांविरुध्द गुन्हा
होम क्वॉरंटाईन केलेले असतानाही बाहेर मुक्तपणे संचार करणाºया चार जणांविरुध्द रामानंद नगर पोलिसात सोमवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. साहील पठाण (२६, रा.समता नगर, जळगाव, मुळ रा.पाळधी, ता.धरणगाव), आदील नवाज खान (२४) एक महिला व सुमीत बनसोडे (सर्व रा.शिवमंदिर,समतानगर) यांचा त्यात समावेश आहे. दरम्यान, यातील एक महिला व सुमीत या दोघांना साहील व आदील यांनी भिवंडी येथून जळगाव शहरात आणले आहे. जिल्हा रुग्णालयात तपासणी केल्यानंतर या सर्वांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नागरिकांना अत्यावश्यक बाब वगळता अनावश्यकरीत्या फिरण्यास, मुक्तपणे संचार करण्यास मनाई केलेली आहे. तोंडाला मास्क लावणेही बंधनकारक केले आहे. त्याचे पालन न करणाºया व्यक्तीविरुध्द गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी सर्व पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
भिवंडी येथून आले दोघे
रामानंद नगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मनोजकुमार राठोड, कॉन्स्टेबल अतुल शंकरराव पवार, नरेंद्र पाटील आदी १८ मे रोजी सायंकाळी त्यांच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था बंदोबस्त करीत असताना समता नगरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ साडे चार वाजता चार जण अनावश्यकरीत्या फिरताना आढळून आले. त्यांची चौकशी केली असता एक महिला व सुमीत या दोघांना साहील व आदील यांनी १५ मे रोजी गोधवली, ता.भिवंडी, जि.ठाणे येथून आणल्याचे निष्पन्न झाले. या चौघांची जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासणी केल्यावर त्यांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले होते. असे असतानाही चारही जण मास्क न लावता अनावश्याक बाहेर फिरत होते. या सर्वांना पोलीस ठाण्यात आणून त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.