पहूर येथे उभारणार कोवीड केयर सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2020 08:25 PM2020-04-12T20:25:39+5:302020-04-12T20:27:15+5:30
१०० खाटा : तीन शैक्षणिक संस्थाकडून मंजुरी
पहूर, ता.जामनेर : कोरोनाचे वाढते संक्रमण पाहता पहूर येथेही खबदारीसाठी शंभर खाटांचे कोवीड केयर सेंटर निर्मितीसाठी प्रशासन तयारीला लागले असून, तातडीने सेंटरची उभारणी करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार कोवीड केयर सेंटर पहूर येथे तातडीने उभारण्यासाठी आरोग्य विभाग कामाला लागले आहे. यासाठी आरोग्यविभागाने केंद्र प्रमुखांकडून शाळेंची माहिती घेतली आहे. त्यानुसार आर.टी.लेले विद्यालय, सावित्रीबाई फुले विद्यालय व महाविर पब्लिक स्कूल यांच्या नावांचा प्रस्ताव जिल्हा शल्यचिकित्सकांकडे वैद्यकीय अधीक्षक डॉ.हर्षल चांदा यांनी पाठविला आह.े याला वरिष्ठ स्तरावरून मान्यता मिळाल्यानुसार या शाळांमध्ये आयसोलेशनचे वॉर्ड तयार करण्यात येणार आहे. तसेच या संस्था चालकांनीही सहकार्याकरीता होकार दिला आहे. तसेच कसबे व पेठ सरंपंचासह सर्व पक्षिय स्थानिक पदाधिकारी यासाठी मदतकार्य करणार आहे.
याठिकाणी कोरोना रूग्णांची संख्येत वाढ जाणवली तर दुसऱ्या शाळा, मंगल कार्यालय किंवा इतर जागा अधिग्रहित करण्यासाठी शासन विचाराधीन असल्याचे डॉ.हर्षल चांदा यांनी सांगितले.
आर.टी.लेले. विद्यालयात साठ खाटा, महावीर पब्लिक स्कूल वीस खाटा व सावित्रीबाई फुले विद्यालय वीस खाटा असे शंभर खाटांचे कोवीड केयर सेंटर तयार करण्यात येत आहे. यासाठी आरोग्य विभाग तातडीने याची उभारणी करणार असल्याचे सांगण्यात आले.