जीएमसीतील कोविड योद्धे आर्थिक संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:16 AM2021-03-16T04:16:31+5:302021-03-16T04:16:31+5:30
लोकमत न्यूज जळगाव : कोविड काळात थेट रुग्णांच्या संपर्कात राहून त्यांच्यावर उपचार करणारे कनिष्ठ निवासी व वरिष्ठ निवासी डॉक्टरांचे ...
लोकमत न्यूज
जळगाव : कोविड काळात थेट रुग्णांच्या संपर्कात राहून त्यांच्यावर उपचार करणारे कनिष्ठ निवासी व वरिष्ठ निवासी डॉक्टरांचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात डिसेंबर महिन्यांपासून पगारच झालेला नसल्याने हे डॉक्टर मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. मेसचे डबेही त्यांचे बंद होण्याच्या मार्गावर आले आहेत. त्यामुळे जीव धोक्यात घालून सेवा देणाऱ्या या वीरांना या संकटातून बाहेर काढणार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सध्या ४८ कनिष्ठ निवासी डॉक्टर आहेत. कोविडकाळात ते पूर्णवेळ सेवा देत आहेत. मागच्या वर्षीही त्यांच्या पगाराबाबत अडचणी निर्माण झाल्या होत्या. मध्यंतरी काहीसा हा विषय मार्गी लागला मात्र, पुन्हा डिसेंबर महिन्यांपासून त्यांना पगार मिळालेला नाही. थेट रुग्णांची सेवा करण्यास सर्वात पुढे कनिष्ठ निवासी डॉक्टर असतात. अशा स्थितीत त्यांना प्रोत्साहनपर मानधन तर दूरच; मात्र पगारच मिळालेला नसल्याने त्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. जेवणाचे डबेही आता अनेक दिवस उधारीवर सुरू असल्याने तेही बंद होण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. दरम्यान, ग्रँट नसल्याचा मुद्दा उपस्थित करून वेतनास विलंब होत असल्याचे सांगितले जात आहे. वरिष्ठ पातळीवरून या गंभीर बाबीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.