कोविडच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना इन्शुरन्स नाहीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:15 AM2021-05-01T04:15:39+5:302021-05-01T04:15:39+5:30
सेवा काळाबाबत नियमीतपणा नाही : रिक्तपदांवर कायम करण्याची मागणी लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हाभरात कोविडचा प्रादूर्भाव वाढल्यानंतर मनुष्यबळाची ...
सेवा काळाबाबत नियमीतपणा नाही : रिक्तपदांवर कायम करण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हाभरात कोविडचा प्रादूर्भाव वाढल्यानंतर मनुष्यबळाची समस्या सोडविण्यासाठी जिल्हाभरातील कोविड सेंटर्समध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती गेल्या वर्षभरापूर्वी करण्यात आली होती. मात्र, सुरुवातीला काही महिने त्यांच्यासाठी असलेला इन्शुरन्स आता बंद करण्यात आला असून, त्यांना अशी कुठलीच मदत नसल्याचे समोर आले आहे. दरम्यान, त्यांची सेवा नेमकी किती कालावधीसाठी असेल, याबाबतही निश्चितता नसून दर दोन महिन्यांनी त्याचे नूतनीकरण होत आहे. यामुळे कर्मचारीही संभ्रमात काम करीत आहे.
गेल्या वर्षभरापासून कंत्राटी कर्मचारी फ्रंट लाइनवर कार्यरत आहेत. यात डॉक्टर, परिचारिका, औषध निर्माते, स्टोअर किपर, डाटा एंट्री ऑपरेटर अशी विविध पदे भरण्यात आली आहे.
किती महिने कंत्राट याबाबत संभ्रम
मध्यंतरी अनेक वेळा कार्यकाळ संपणे व नूतनीकरण होणे अशा बाबी सुरू असल्याने हे कर्मचारीही संभ्रमात काम करीत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, ३० एप्रिल रोजी पुन्हा दिलेला कार्यकाळ संपल्याने आता काय करावे? असा प्रश्न या कर्मचाऱ्यांच्या पुढे आहे. कोविड असेल तोपर्यंत असे नमूद करून दोन दोन महिन्यांचा करार करण्यात येत असतो. त्यामुळे एकाच वेळी किमान ११ महिन्यांचा करार करावा, असे या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
एका कर्मचाऱ्याला इजा
फ्रंट लाइनवर काम करीत असताना यातील अनेकजण बाधितही झाला. काहींचे तर पूर्ण कुटुंबच बाधित होते. शिवाय नुकतेच एका कोविड सेंटरमध्ये अंगावर सिलिंडर पडून एक कर्मचाऱ्याला गंभीर इजा झाली मात्र, त्यांना कुठलीही मदत मिळाली नाही. इन्शुरन्स सुरुवातीला काही महिने होता. मात्र, तो अचानक बंद करण्यात आला आहे. त्यामुळे लढणाऱ्या या योद्धांना मदत मिळावी, अशीही एक मागणी समोर येत आहे.
मागणीसाठी रेड अलर्ट आंदोलन
गेल्या वर्षभरापासून कोविडच्या कठीण काळात कार्यरत असलेल्या या कंत्राटी कर्मचाऱ्यांना रिक्तपदांवर सेवेत सामावून घ्यावे, अशी प्रमुख मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. शिवाय करार हा किमान ११ महिन्यांचा असावा, असेही त्यांनी म्हटले आहे. प्रमुख मागण्यांसाठी नुकतेच कोविड सेंटरमधील या कर्मचाऱ्यांनी रेड अलर्ट आंदोलनही केले होते. शिवाय मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला होता.
कोट
दर दोन महिन्यांनी आमचा कार्यकाळ संपविण्यात येतो. नंतर तीन ते चार दिवसांनी तो नूतनीकरण करून पुन्हा दोन महिन्यांसाठी वाढवून देण्यात येतो. अशा स्थितीत काम करण्याची मानसिकता कशी राहणार. किमान कंत्राटी पद्धतीनुसार ११ महिन्यांचा कार्यकाळ असावा.
- एक कंत्राटी कर्मचारी
आरोग्य विभागात अनेक रिक्त पदे आहेत. त्यावर गेल्या वर्षापासून कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत समावून घ्यावे. सर्व कर्मचारी कोविडच्या या संकटात अगदी समोर येऊन आपली जबाबदारी पार पाडत आहेत. त्याची दखल घेतली जावी.
- एक कंत्राटी कर्मचारी
शासकीय स्तरावर काही इजा झाल्यास काही घटना घडल्यास इन्शुरन्स असणे गरजेचे आहे. शासनाने यावर व्यवस्था करणे गरजेचे आहे. मात्र, तसे झालेले नाही. थेट रुग्णांशी संपर्क असेल किंवा प्रशासकीय कामांसाठी नियमित कार्यालयात उपस्थित राहणे असेल. या सर्व बाबी सध्या धोकेदायक आहे.
- एक कंत्राटी कर्मचारी
कोविड केअर सेंटर्स २४
कंत्राटी कर्मचारी ७५०