महिनाभरात कोविडची ग्रामीण शासकीय केंद्रे बंद होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:18 AM2021-02-09T04:18:38+5:302021-02-09T04:18:38+5:30
जळगाव : कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याने शिवाय सक्रिय रुग्णांची संख्या कमी असल्याने ग्रामीण भागात असणारी कोविड उपचाराची केंद्र ...
जळगाव : कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याने शिवाय सक्रिय रुग्णांची संख्या कमी असल्याने ग्रामीण भागात असणारी कोविड उपचाराची केंद्र महिनाभरात बंद करून जळगावात दोन केंद्रांमध्येच रुग्णांची व्यवस्था करण्यात येणार आहे. जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातही आता केवळ अतिगंभीर रुग्णांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात येत आहे. अन्य रुग्णांना इकरा वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले आहे.
सप्टेंबर महिन्यांपासून सक्रिय रुग्णांची संख्या घटून पाचशेपर्यंत आली होती. तेव्हापासून सक्रिय रुग्णांची संख्या आटोक्यात असून संसर्गाचे प्रमाण कमी झाले आहे. कोरोना हा अंतिम टप्प्यात असल्याचे हे समाधानकारक चित्र असल्याचे प्रशासकीय यंत्रणेचे म्हणणे असून शासकीय यंत्रणेत उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या शंभराच्या खालीच अनेक महिने स्थिर आहे. आता जेवढे रुग्ण आहेत त्यातील खासगी यंत्रणेत निम्मे रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे चाळीसगाव, चोपडा, जामनेर, अमळनेर या ठिकाणची कोविड सेंटर महिनाभरात बंद करण्यात येतील, असे जिल्हा शल्यचिकत्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी सांगितले. तपासणी मात्र, सर्वत्र सुरूच राहणार आहे.
इकरा महाविद्यालयात व्यवस्था
महापालिकेचे कोविड केअर सेंटर बंद करून इकरा वैद्यकीय महाविद्यालयात सौम्य लक्षणांच्या रुग्णांची उपचाराची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, आता मध्यम स्वरूपाचे रुग्णही त्या ठिकाणी हलविण्यात आले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कोरोनाच्या दोनही कक्षात सद्य:स्थितीत एकही रुग्ण नाही. केवळ अतिदक्षता विभागातच रुग्णांना दाखल करण्यात आले आहे.
रुग्णांची स्थिती अशी
सक्रिय रुग्ण : ३२९
होम आयसोलेशन : २००
शासकीय यंत्रणेत उपचारार्थ दाखल : ८४
खासगी यंत्रणेत दाखल : ४५