‘गुड बोला गोड बोला’ : सणांच्या माध्यमातून कृषीजीवन बहरून येते - कृषीभूषण विश्वासराव पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 02:36 PM2019-01-17T14:36:00+5:302019-01-17T14:36:35+5:30
मकरसंक्रांत या सणांंच्या माध्यमातून शेती जीवन अनंत अंगांनी बहरून येत
लोहारा, ता.पाचोरा : भारतीय संस्कृतीचाच एक भाग म्हणून विजयादशमी, दीपावली, अक्षय्यतृतीया त्याचप्रमाणे मकरसंक्रांत या सणांंच्या माध्यमातून शेती जीवन अनंत अंगांनी बहरून येते. त्यानिमित्ताने नवा उत्साह नवचैतन्य यामुळे ग्रामीण भागातील लोकजीवन अक्षरश: ढवळून निघत असते, असे लोहारा, ता.पाचोरा येथील रहिवासी तथा कृषीभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी विश्वासराव पाटील यांनी सांगितले.
मकरसंक्रांतीच्या पर्वावर ‘गुड बोला गोड बोला’ यावर ते आपली भूमिका मांडत होते. या सणांच्या माध्यमातून जो गोडवा निर्माण होतो त्यामुळेच आपली संस्कृती अनादी काळापासून टिकून आहे व ती सदैव टिकून राहील हे निश्चित.
या विश्वात अनेक संस्कृती आल्या-गेल्या, परंतु भारतीय संस्कृती ही गौतम बुद्ध असो, महात्मा गांधी असो,भगवद् गीता असो किंवा ज्ञानोबा, एकोबा, तुकोबा या सर्वांनी आपल्या वाणीतून व कृतीतून गोडवा निर्माण केलेला असल्याने टिकून आहे. शेतीमध्ये प्रत्येक दिवशी अनेक संक्रमणे होत आहेत. पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. तरीसुद्धा शेतकरी व शेतमजूर यांचे गोड संबंध अनादी काळापासून आजपर्यंत टिकून आहे.
‘लोकमत’ने ‘गुड बोला’ ‘गोड बोला’ या सदराच्या माध्यमातून देश जोडण्याचे जे कार्य सुरू केले आहे. असे असले तरी माझ्या दृष्टीने हे कार्य संपूर्ण विश्व जोडण्याचे कार्य आहे. दया, क्षमा, शांती यावरच भारतीय संस्कृती उभी आहे. तिला उजळून देण्याचे कार्य ‘लोकमत’ करीत आहे, असेच यानिमित्ताने सांगावेसे वाटते.