विक्रमी उत्पन्न काढणारा कृषिरत्न लीलाधर पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 11:05 PM2017-09-07T23:05:30+5:302017-09-07T23:06:46+5:30
शेतीला पूरक व्यवसायाची जोड देऊन अपंगत्वावर केली मात
आॅनलाईन लोकमत दि, ७ - चोपडा तालुक्यातील हजार लोकवस्तीचे गाव असलेल्या मालखेडा येथील लीलाधर पाटील या तरुण शेतकºयाने अपघातात आपला डावा हात व पायावर प्रचंड आघात झाल्यावरही नशिबाला दोष न देता, खचून न जाता प्रचंड जिद्द व मेहनतीच्या जोरावर आपले ध्येय गाठण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले़ अल्पशा जमिनीत वर्षभरात विविध पिके घेत शेळी पालन हा पूरक व्यवसाय करून आपला व परिवाराचा उत्कर्ष साधला. त्याच्या कायार्तून आजच्या तरुण बेरोजगारांनी व शेतकºयांनी प्रेरणा घ्यावी असे कार्य आहे. लीलाधर पाटील यांना शेती पूरक व्यवसायासाठी सर्वप्रथम कृषिथॉनचा नाशिक विभागीय स्तराचा आदर्श शेळी पालन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. नंतर मार्च २०१७ मध्ये दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. तसेच नुकताच वसंतराव नाईक कृषिरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
लीलाधार पाटील यांच्या घरात आईवडील व दोन भाऊ असे सदस्य असताना मोठा या नात्याने वरील सर्वांची पालन- पोषणाची जबाबदारी त्यांच्यावर होती़ त्यासाठी त्यांनी ट्रक चालकाचा व्यवसाय १९९६ साली स्वीकारला होता. सलग तीन वर्षे रात्रंदिवस काम करीत होते़ मात्र एकदा दुर्दैवाने १४ मे १९९९ रोजी अपघात होऊन ते जबर जखमी झाले. या अपघाताने त्यांना डावा हात व पायाचे अपंगत्व आले. अपंग झाल्यावरही त्यांनी कोणासमोर लाचारी न पत्करता गावात पान टपरी सुरू केली. या काळात परिवाराची जबाबदारी वृद्ध आई, वडील व लहान भावंडांवर येऊन ठेपली म्हणून स्वस्थ न बसता त्यांनी पान टपरी चालवित हातभार लावण्याचा प्रयत्न केला. अशात आपली गुजराण होणार नाही हे पाहत त्यांनी स्वत:च्या हिमतीवर दुसरा व्यवसाय करण्याचे ठरविले.
व्याजाने पैसा उभारला : पान टपरीवर संपूर्ण परिवाराचा गाडा चालेल हे दिसत नव्हते. अपंग असतानाही काहीतरी करण्याची जिद्द व उर्मी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती़ मालखेडा हे गाव नदी काठावर आहे त्यांच्या गावाला ९ एकराहून अधिक गावरान क्षेत्र आहे. यात गावातील गुरे, बकºया चारईसाठी जातात. याचा लाभ घेत सहा शेळ्या व एक बोकड घेऊन पूरक व्यवसाय करण्याचा बेत त्यांनी आखला. मात्र जवळ पैसे नाहीत. गावातून व्याजाने पैसे उचलून त्यांनी व्यवसाय करण्याचा निश्चय केला़ मात्र अपंगत्व असताना या व्यवसायात उतरणे धोक्याचे असल्याने परिवारातील सर्व सदस्यांचा त्यांना विरोध झाला होता, मात्र ते निश्चयावर कायम होते़
केळी व कलिंगडाचे विक्रमी उत्पन्न
गेल्या वर्षी श्रीमंती या केळी वाणाची लागवड त्यांनी शेतात केली . खरिपात आधी मुगाचे उत्पन्न घेतले. मुगाच्या शेंगा तोडणी झाल्यावर त्याच्या झुडपांना पाल्यासकट जमिनीत गाडल्याने हिरवळीचे खत झाले़ त्यावर सेंद्रिय व लेंडी खत टाकून जमिनीची मशागत करून केळी लागवड केली़ तिच्यात निव्वळ नफा झाला़ त्या केळीवर कलिंगड लागवड केली़ त्याचे ७७ टन इतके विक्रमी उत्पन्न आले. उत्पादित झालेले कलिंगड चवदार व मोठ्या आकाराचे असल्याने गुजरातच्या व्यापाºयाने तो माल दर्जा उत्तम असल्याने थेट काश्मिरात विक्रीसाठी पाठविला़
त्यांना अपंग वित्त व विकास महामंडळाकडून मिळणाºया अर्थ साह्य योजनेचा लाभ घेत येथून एक लाख रुपये कर्ज मिळाल्याने त्यांनी २०१५ साली निवारा शेड उभारले. त्यांनी २०१३ आतापर्यंत १०० शेळ्या विकून ५ लाखांचे उत्पन्न या पूरक व्यवसायातून मिळविले.
घरच्या दीड एकर शेतीत लेंडी खत टाकल्याने उत्पादन चांगले आले. एवढ्यावर स्वस्थ न बसता त्यांनी परिवारातील सदस्यांच्या मदतीने निम्मे हिश्श्याने चार एकर शेती केली़ त्यात व घरच्या दीड एकर क्षेत्रात केळी, त्यावर कलिंगड लागवड करीत विक्रमी उत्पादन घेतल्याने त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे सार्थक झाल्यासारखे वाटले.
लीलाधर पाटील यांनी जिल्हा उद्योग केंद्रामार्फत एक महिन्याचे शेळी पालन व्यवसायाचे प्रशिक्षण घेतले़ यातील ज्ञानाच्या आधारावर आपल्याकडील शेळ्या व पिल्लांचे उत्तम संगोपन करण्यावर भर दिला. त्यानी फक्त जनावरांची संख्या वाढविण्यावर भर न त्यांचे दर्जेदार उत्पादन कसे होईल यावर भर दिला. संगमनेरी गावरान जातीच्या शेळीचे पालन केले. यात ते शेळीचे दूध न काढता संपूर्ण दूध पिल्लांसाठी सोडून देतात, त्यामुळे ते लवकर वाढतात़ सशक्त वाढ झाल्याने बाजारात किंमतदेखील चांगली मिळते, असा त्यांचा अनुभव आहे.