कुंड्यापाणी फिडर ५० तासांपासून बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:13 AM2021-06-04T04:13:44+5:302021-06-04T04:13:44+5:30
वीज अभियंता म्हणाले ... आमदार - खासदारांना सबस्टेशन बनवायला सांगा... लोकमत न्यूज नेटवर्क बिडगाव ता.चोपड : कुंड्यापाणी ...
वीज अभियंता म्हणाले ... आमदार - खासदारांना सबस्टेशन बनवायला सांगा...
लोकमत न्यूज नेटवर्क
बिडगाव ता.चोपड : कुंड्यापाणी फिडर गेल्या ५० तासांपासून नादुरुस्त झाले आहे. पिकांना पाणी नसल्याने उगवलेली कापसाची रोपे करपत आहेत. यामुळे शेतकरी हताश झाले आहेत. याबाबत संबंधित अभियंत्यास काही शेतकरी विचारणा करण्यास गेले असता तुमच्या आमदार, खासदारांना सबस्टेशन बनवायला सांगा, असे उत्तर त्यांनी दिल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
या परिसरात मोठ्या प्रमाणावर बागायती कापसाची लागवड करण्यात आली आहे. जेमतेम आठ तास वीज मिळत आहे. त्यातच अति तापमान, यात पीक उगवणे खूप जिकिरीचे ठरत आहे. कुंड्यापाणी या फिडरला चार दिवस रात्री वीज मिळते. मंगळवारी सकाळी ६ वाजता बंद झालेला वीजपुरवठा बुधवारी रात्री ८ वा. सुरू होणार होता. मात्र किरकोळ बिघाड झाल्याने धानोरा वीज वितरणने या भागातील तब्बल २५ ते ३० डिपीच बंद करून टाकल्या. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी धानोरा येथे धाव घेतली. तेथे ऑपरेट व्यतिरिक्त कोणीही आढळून आले नाही. तेव्हा शेतकऱ्यांनी प्रभारी कनिष्ट अभियंता सूरज मंडोधरे यांना फोन लावून वीजपुरवठा सुरळीत करण्याची विनंती केली असता. त्यांनी वरीलप्रमाणे उत्तर दिल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
या भागातील फिडर गेल्या ५० तासांपासून बंद आहे. त्यामुळे विहिरीत पाणी असूनही ते पिकाला पाणी देता येत नसल्याने जेमतेम उगवलेली कापसाची रोपे करपत असल्याने शेतकरी संताप व्यक्त करीत आहे.
चौकट
याबाबत धानोरा वीज वितरण कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता सूरज मंडोधरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यासंबंधी फोनवर कोणतीही प्रतिक्रिया देत नाही. कार्यालयात या मगच बोलेल, असे सांगितले.