कुऱ्हे बुद्रुक गावानेही नदी नांगरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:12 AM2021-07-05T04:12:42+5:302021-07-05T04:12:42+5:30
अमळनेर : तालुका अवर्षणप्रवणग्रस्त असल्याने सिंचन क्षमता वाढवण्यासाठी कुऱ्हे खुर्द गावाने चिखली नदी नांगरल्यानंतर कुऱ्हे बुद्रूक गावानेदेखील पुढाकार ...
अमळनेर : तालुका अवर्षणप्रवणग्रस्त असल्याने सिंचन क्षमता वाढवण्यासाठी कुऱ्हे खुर्द गावाने चिखली नदी नांगरल्यानंतर कुऱ्हे बुद्रूक गावानेदेखील पुढाकार घेऊन त्यांच्या हद्दीतील नदी नांगरली आहे. त्यामुळे भविष्यातील समस्येवर मात करता येणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून चिखली नदीत गाळ साचल्याने वरचा पृष्ठभाग कडक होऊन सिंचन क्षमता कमी झाली होती. काही दिवसांपूर्वी कुऱ्हे खुर्द गावचे ईश्वर पाटील व इतरांच्या सहकार्याने त्यांच्या हद्दीतील नदी नांगरण्यात आली. पावसाचे पाणी वाहून जात होते. नदी नांगरून जमीन भुसभुशीत करून पाणी जिरवले जाऊ शकते. म्हणून पावसाने दांडी मारली असली तरी आगामी संकट ओळखून सिंचन वाढवण्यासाठी माजी सरपंच विजयसिंग पाटील, विकासोचे अध्यक्ष महिंद्र मूलचंद पाटील, उपाध्यक्ष प्रमोद चौधरी, सुनील पाटील, विनोद जैन, कोमलसिंग पाटील यांच्या सहकार्यातून चिखली नदी नांगरली आहे. यामुळे सिंचन वाढून विहिरींची पाणी पातळी वाढेल. शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. एका गावाने केलेल्या चांगल्या कामाचा हेवा दुसऱ्या गावाने केल्याने विकासात व समृद्धीत भर पडणार आहे. अमळनेर अवर्षण प्रवणग्रस्त तालुका असल्याने सामुदायिक योगदानातून नद्या, नाले नांगरण्याची गरज आहे.