सुवर्णबाजारावर आता ‘केवायसी’चे भूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 12:35 PM2017-09-01T12:35:11+5:302017-09-01T12:38:47+5:30
जीएसटी धोरणात बदल : 50 हजाराच्या खरेदीवर द्यावी लागणार ग्राहकाला संपूर्ण माहिती
ऑनलाईन लोकमत / विजयकुमार सैतवाल
जळगाव, दि. 1 - आधीच मंदीत असलेल्या सुवर्णबाजारावर आता पुन्हा जीएसटीतील बदलामुळे परिणाम होत आहे. 50 हजाराच्या खरेदीवर आता ग्राहक व विक्रेता या दोघांचे ‘केवायसी’ करणे सक्तीचे केल्याने ग्राहकही धास्तावले असून त्याने सुवर्णबाजाराकडे जणू पाठच फिरवली आहे. यात भरात भर म्हणजे उत्तर कोरिया व जपान यांच्यातील तणावामुळे सोन्याचे भाव मोठय़ा प्रमाणात वाढले असून एकाच दिवसात 500 रुपयांनी भाववाढ झाली आहे. विशेष म्हणजे मागणी नसताना सोन्याच्या भावात वाढ होत असल्याने सुवर्णनगरीतील व्यापा:यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
लग्न सराई संपल्यानंतर सुवर्णबाजारात मंदीची स्थिती असताना 1 जुलैपासून वस्तू व सेवा कराची (जीएसटी) अंमलबजावणी सुरू झाली व सोन्यावर 3 टक्के कर मोजावा लागत आहे.
जीएसटीच्या अंमलबजावणीमध्ये ग्राहकाला 10 हजार रुपयांच्या वर रोख खरेदीला बंदी घालण्यात आली. त्यानंतर आता 23 ऑगस्टपासून जीएसटीच्या धोरणात पुन्हा बदल केला असून 50 हजार रुपयांवरील खरेदी करायची झाल्यास आता सोने खरेदी करणारा ग्राहक व विक्रेता या दोघांचे ‘केवायसी’ करावे लागणार आहे. यामध्ये ज्या प्रकारे बँकेच्या खात्यासाठी सर्व कागदपत्रे द्यावी लागली त्यानुसार संपूर्ण माहिती ग्राहक व विक्रेत्याला द्यावी लागणार आहे.
आधीच ग्राहक जीएसटीच्या संभ्रमासह धास्तावलेला असताना आता दोन तोळ्य़ाचीही किंमत नसलेल्या 50 हजारासाठी केवायसी करावी लागणार असल्याने जळगावात खरेदीसाठी येणारे खेडय़ा-पाडय़ातील लहान विक्रेते हवालदिल झाले आहेत.
जीएसटीमुळे एक तर सर्व व्यवहारांची नोंद ठेवणे सक्तीचे केले असताना आता 50 हजाराच्या खरेदीसाठी ग्राहकाला आपली संपूर्ण माहिती द्यावी लागणार असेल तर त्यापेक्षा बिलाविना खरेदी करण्यास चालणा मिळून जीएसटीतून चोरवाटा तयार होऊ शकतात, असा अंदाज जाणकारांनी वर्तविला आहे.
उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्राच्या सुवर्णनगरीला झळा
उत्तर कोरियाने जापानवर क्षेपणास्त्र डागल्यामुळे प्योंगयांग व अमेरिका यांच्यातील तणाव वाढून त्याचा सोन्याच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर परिणाम झाला. यातून सोन्याच्या भावात वाढ होऊ लागली व त्याच्या झळा सुवर्णनगरी जळगावात जाणवू लागल्या. आठवडाभरात सोन्याचे भाव दररोज वाढले. इतकेच नव्हे 29 ऑगस्ट रोजी एकाच दिवसात सोन्याच्या भावात 500 रुपयांनी वाढ होऊन सोने 30 हजाराच्या पुढे (30,100) गेले. ऐन मंदीत ग्राहकीवर याचा परिणाम होत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
ग्राहकी नसताना भाववाढ
कोणत्याही वस्तूला मागणी वाढली तर त्याचे भाव वाढतात. मात्र सध्या सुवर्णबाजारात मंदी असतानाही सोन्याच्या भावात वाढ होत आहे. 23 ऑगस्ट रोजी 29,200 रुपये प्रति तोळे असणा:या सोन्याच्या भावात आठवडाभरात 900 रुपयांनी वाढ होऊन ते 29 रोजी 30, 100 रुपये प्रति तोळ्य़ावर पोहचले. विशेष म्हणजे 28 रोजी 29,600 रुपयांच्या भावात एकाच दिवसात 500 रुपयांची भाववाढ झाली व 29 रोजी हे भाव 30,100 रुपये झाले.
व्यापारी बसून सोन्याच्या मोठय़ा अस्थापनामध्ये साधारण ग्राहकी असते. मात्र लहान व्यावसायिक तर हातावर हात धरून बसले आहे. सकाळी येऊन दुकान उघडायचे व संध्याकाळी घरी परतायचे, असा दिनक्रम झाल्याचे काही विक्रेत्यांनी सांगितले.
लग्न सराई संपल्यापासून सुवर्णबाजारात मंदी आहे. त्यात जीएसटीचा परिणाम जाणवला. त्यातून थोडे सावरत नाही तोच आता पुन्हा जीएसटीच्या धोरणात बदल केल्याने ग्राहक धास्तावला आहे. यामुळे व्यापारीही हैराण होणार आहे.
- गौतमचंद लुणिया, जिल्हाध्यक्ष, जळगाव सराफ बाजार असोसिएशन
सध्या सुवर्णबाजारात ग्राहकी अत्यंत कमी आहे. जीएसटीतून थोडे सावरत आहे. मात्र आता उत्तर कोरिया व जापान यांच्या तणावामुळे सोन्याचे भाव वाढत आहे.
- स्वरुप लुंकड, सचिव, सराफ बाजार असोसिएशन