मताधिक्यासाठी भाजपाला घ्यावे लागणार परिश्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 11:03 AM2019-03-25T11:03:01+5:302019-03-25T11:03:58+5:30
तालुका वार्तापत्र : साक्री
साक्री : नंदुरबार मतदार संघ हा काँग्रेससाठी शुभशकुन ठरला होता. परंतु काँग्रेसच्या अभेद्य तटबंदीला सुरुंग लावण्याचे काम डॉ. हीना गावित यांनी केले. मात्र यंदा त्यांना साक्री तालुक्यात मताधिक्यासाठी अधिक परिश्रम घ्यावे लागणार असल्याचे मानले जात आहे.
पुनर्रचनेनंतर साक्री तालुका नंदुरबार लोकसभा मतदारसंघाला जोडला गेला आहे. साक्री तालुक्यात काँग्रेसचे वर्चस्व आहे. धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवाजीराव दहिते यांनी मतदारसंघ बांधून ठेवला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकी वेळी मोदी लाट होती. या लाटेत साक्रीतून भाजपाला केवळ १ हजार ७४७ मतांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत डॉ. हीना गावित यांना अधिक परिश्रम घ्यावे लागणार आहेत. नाराज शिवसेना त्यांना मनापासून किती सहकार्य करेल याविषयी शंका आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाप्रसंगीच्या प्रकरणामुळे मराठा समाजामध्ये त्यांच्याबद्दल नाराजी आहे.
धुळे लोकसभा मतदार संघातील भाजपाचे उमेदवार डॉ.सुभाष भामरे हे साक्री तालुक्यातील रहिवासी आहेत. त्यांच्या तालुक्यात शिक्षणसंस्थाही आहेत. त्यांच्या जनसंपर्काचा फायदा डॉ.गावित यांना होईल.
दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे अॅड. के.सी. पाडवी रिंगणात आहेत. त्यांचा साक्री तालुक्योशी फारसा जवळचा संबंध नाही, परंतु काँग्रेस पक्षाचे नेटवर्क त्यांच्या कामी येऊ शकते. भरत गावीत यांना तिकिट नाकारल्याने त्यांच्या समर्थकांची नाराजी दूर करण्याचे काम अॅड.पाडवींना करावे लागणार आहे.
साक्री नगरपंचायतीवर काँग्रेसचे वर्चस्व
तालुक्यातील साक्री नगरपंचायतीवर काँग्रेसने ग्रामपंचायतीपासूनचे आपले वर्चस्व अबाधित ठेवले आहे. नगरपंचायतीत काँग्रेसने १६ पैकी ११ जागा मिळविल्या. तर आघाडीतील राष्टÑवादीने ४ जागा मिळविल्या आहे.एक अपक्ष निवडून आला आहे. नगरपंचायतीत भाजपला खातेही उघडता आलेले नाही.